
Mahabeej board election stalled for the second time in a row : डॉ.रणजीत सपकाळ, वल्लभराव देशमुख यांची निवड
Akola महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) दोन संचालकपदांची निवडणुकीत सलग तो दुसऱ्यांदा अविरोध झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत दोन मतदारसंघांतील तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने विद्यमान संचालक डॉ. रणजीत सपकाळ आणि वल्लभराव देशमुख यांची ‘महाबीज’च्या संचालकपदी पूर्ण वर्णी लागली आहे.
‘महाबीज’च्या संचालक मंडळावर शेतकरी भागधारकांतून दोन संचालकांची निवड करण्यासाठी टपाली मतपत्रिकांद्वारे निवडणूक घेण्याचा कार्यक्रम ९ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार मतदारसंघ १ व मतदारसंघ २ मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २ फेब्रुवारीपर्यंत होती. या कालावधीत एकूण पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
मतदारसंघ १ मधून माजी संचालक डॉ. रणजीत सपकाळ आणि नानाराव देशमुख यांनी, तर मतदारसंघ २ मधून माजी संचालक वल्लभराव देशमुख, ॲड. विष्णुपंत सोळंके आणि भूषण देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या विहित मुदतीत मतदारसंघ १ मधून नानाराव देशमुख, तर मतदारसंघ २ मधून ॲड. विष्णुपंत सोळंके आणि भूषण देशमुख यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
परिणामी, दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी एकच उमेदवार शिल्लक राहिल्याने डॉ. रणजीत सपकाळ आणि वल्लभराव देशमुख यांची ‘महाबीज’च्या संचालकपदी औपचारिकरीत्या अविरोध निवड झाली आहे. येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या ‘महाबीज’ संचालक मंडळाच्या बैठकीत या अविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती कंपनी सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी विनय वर्मा यांनी दिली.
BMC mayor election : युतीच्या संख्याबळाला ठाकरेंचे ‘चॅलेंज’, नगरसेवकांना मुंबई न सोडण्याचे आदेश
‘महाबीज’चे विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असे दोन मतदारसंघातून संचालक निवडले जातात. मतदारसंघ १ आणि मतदारसंघ २ अशा दोन मतदारसंघांतून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येते. मतदारसंघ १ मध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्यांतील २,६५९ भागधारक शेतकरी मतदारांचा समावेश आहे.
मतदारसंघ २ मध्ये बुलढाणा, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, ठाणे आणि मुंबई या २२ जिल्ह्यांतील २,६०० लाभधारक शेतकरी मतदार आहेत.








