sachin-ahir-elected-unopposed-as-maharashtra-vidhan-parishad-deputy-chairman : ठाकरेंच्या उमेदवारांची ऐनवेळी माघार, महायुतीकडून जोरदार स्वागत
Mumbai : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार सचिन अहिर यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीकडून उमेदवारी दाखल करण्यात आलेले शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्यानंतर आवाजी मतदानाद्वारे सचिन अहिर यांच्या नावावर सभागृहाची एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडीमुळे विधान परिषदेत महायुतीला आणखी एक महत्त्वाचे घटनात्मक पद मिळाले आहे.
उपसभापतीपदाच्या निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सभागृहात उपस्थित होते. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने सचिन अहिर यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र, मतदानाची वेळ येण्यापूर्वीच महाविकास आघाडीने आपला उमेदवार मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
या निवडणुकीसाठी महायुतीकडून सचिन अहिर, तर महाविकास आघाडीकडून जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाची परंपरा जपत सर्वानुमते निवड व्हावी, अशी विनंती विरोधकांना केली. त्यावर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहाच्या सन्मानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आवाजी मतदानाद्वारे सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
Raj Thackeray : ‘देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईकं मिळणारच’!
निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन अहिर यांचे अभिनंदन करत विरोधी पक्षाचेही आभार मानले. “१९९९ मध्ये मी आणि सचिन अहिर एकत्र निवडून आलो होतो. ते निर्भीड, अभ्यासू आणि सभागृहाच्या कामकाजाची जाण असलेले लोकप्रतिनिधी आहेत. उपसभापती म्हणून ते सर्व सदस्यांना समान न्याय देतील, याची खात्री आहे,” असे फडणवीस म्हणाले. त्यांनी माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्याचाही गौरव करत त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सचिन अहिर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. “प्रत्येक खेळाडूची स्वतःची शैली असते. नावातच ‘सचिन’ असल्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. एक सचिन क्रिकेटमध्ये इतिहास घडवून निवृत्त झाला, तर दुसरा सचिन आता विधान परिषदेच्या मैदानात नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे,” असे म्हणत त्यांनी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट मिळवला. समाजकारण, कामगार चळवळ आणि जनसंपर्काच्या माध्यमातून सचिन अहिर यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.
Husband suicide : नाशिक हादरलं! पत्नीच्या कथित मानसिक छळाला कंटाळून नवऱ्याचे टोकाचे पाऊल
सचिन अहिर यांचा राजकीय प्रवासही अनेक घडामोडींनी भरलेला आहे. कामगार चळवळीतून राजकारणात आलेल्या अहिर यांनी १९९९, २००४ आणि २००९ मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. २००९ मध्ये त्यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. जुलै २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०२० मध्ये त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाली, तर २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर सदस्य म्हणून आले. ३० जून २०२६ रोजी त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोडून शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केला आणि त्याच दिवशी उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अवघ्या एका दिवसात त्यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू आहे.
सध्याच्या विधान परिषदेतील संख्याबळ पाहता भाजपकडे ३५, शिवसेना (शिंदे गट)कडे १३, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडे १०, शिवसेना (ठाकरे गट)कडे ५, काँग्रेसकडे ५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडे २, तर ३ अपक्ष सदस्य आहेत. या संख्याबळामुळे महायुतीचे वर्चस्व कायम असल्याचे या निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
___








