Amravati Municipal Corporation : एमआयएमच्या नगरसेविकेचे भाजपला मतदान; मीरा कांबळेंची पक्षातून हकालपट्टी

AMIM-corporator-meera-kamble-votes-for-bjp-expelled-from-party : ‘योग्य वाटले म्हणून मतदान केले’; पक्षाचा तटस्थ राहण्याचा निर्णय झुगारला

Amravati अमरावती महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत शुक्रवारी राजकीय भूकंपाचे केंद्र ठरल्या एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे. एमआयएम पक्षाने निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असतानाही, कांबळे यांनी थेट भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली. या पक्षशिस्तभंगाची गंभीर दखल घेत एमआयएमने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली असून, आता त्यांच्या नगरसेवक पदावरही गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापौर निवडीसाठी हात उंचावून मतदान प्रक्रिया सुरू असताना एमआयएमच्या गोटातील नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजप उमेदवाराच्या बाजूने हात उंचावला. ही कृती चुकून झाली नसून जाणीवपूर्वक केल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले. “महापौर म्हणून जो उमेदवार योग्य वाटला, त्यालाच मी मतदान केले,” अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली. “माझा मुलगा अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे, त्याच्या सांगण्यावरूनच मी भाजपला मतदान केले,” अशी कबुली त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Epstein files case : युवक काँग्रेस १० फेब्रुवारीला संसदेला घेराव घालणार; अकोल्यातून हजारो तरुण दिल्लीकडे कूच करणार

एमआयएमचे गटनेते अब्दुल हमीद यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पक्षातर्फे या निवडणुकीत कुणालाही मतदान न करता ‘तटस्थ’ राहण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाचे उल्लंघन केल्याचा ठपका कांबळे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार मीरा कांबळे यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. पक्षाचा आदेश (व्हीप) न पाळल्याप्रकरणी त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचेही गटनेत्यांनी स्पष्ट केले.

मीरा कांबळे या बडनेरा परिसरातील प्रभाग क्रमांक २० मधून अनुसूचित जाती महिला आरक्षित जागेवरून एमआयएमच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अमरावतीतील भाजप-एमआयएममधील छुप्या समीकरणांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

Baramati by election : अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी सुरू

जर एमआयएमने अधिकृत लेखी ‘व्हीप’ जारी केला असेल, तर पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार (Anti-Defection Law) मीरा कांबळे यांचे पद धोक्यात येऊ शकते. मात्र, “कारवाई झाल्यास उत्तर देण्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय आहेत,” असे म्हणत कांबळे यांनीही कायदेशीर लढाईची तयारी दर्शवली आहे