ZP Election Results : जिल्हा परिषदेत निकालात ‘या’ ठिकाणी भाजपवर नामुष्की

parbhani-zilla-parishad-election-bjp-varpudkar-family-defeat : बड्या नेत्याच्या कुटुंबातील पाचपैकी चार उमेदवार पराभूत

Parbhani : परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याला मोठा धक्का दिला असून, घराणेशाहीला स्पष्ट नकार दिल्याचे चित्र समोर आले आहे. परभणीतील लोहगाव जिल्हा परिषद सर्कलसह विविध गटांमधून भाजपचे माजी मंत्री आणि वरिष्ठ नेते सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबातील तब्बल पाच सदस्य निवडणूक रिंगणात होते. मात्र, या पाचपैकी चार उमेदवारांचा दारुण पराभव झाला असून, फक्त एकाच सदस्याला विजय मिळवता आला आहे.

सुरेश वरपूडकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत कुटुंबातील एक-दोन नव्हे तर थेट पाच सदस्यांना वेगवेगळ्या पक्षांतून उमेदवारी दिल्याने निवडणुकीआधीच ही बाब मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती. त्यांचे पुत्र समशेर वरपूडकर शिंगणापूर गटातून, सून प्रेरणा वरपूडकर दैठणा गटातून, मुलगी सोनल देशमुख शिवसेना ठाकरे गटातून, तर पुतणी ऐश्वर्या वरपूडकर जांब गटातून निवडणूक लढवत होत्या. याशिवाय पुतणे अजित वरपूडकर यांनी काँग्रेसकडून लोहगाव गटातून उमेदवारी केली होती.

Sanjay Raut: संघामुळे भाजपला ‘अच्छे दिन’, पण त्याच भाजपच्या सत्तेमुळे अधोगती!

मतमोजणीनंतर समोर आलेल्या निकालानुसार, वरपूडकर कुटुंबातील केवळ अजित वरपूडकर यांनाच विजय मिळवता आला आहे. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या अजित वरपूडकर यांनी कुटुंबाची लाज राखली असली, तरी उर्वरित चारही उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजप नेते सुरेश वरपूडकर यांना मोठी राजकीय नामुष्की सहन करावी लागली आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेवर जाणार का?

एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना वेगवेगळ्या पक्षांतून निवडणुकीला उभे करून सत्तेच्या सर्व चाव्या आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न मतदारांनी साफ हाणून पाडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. परभणीकरांनी या निकालातून घराणेशाहीला स्पष्ट नकार दिला असून, जिल्हा परिषद निवडणुकीत जनतेने दिलेला हा कौल भविष्यातील राजकारणासाठी महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.

___