व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेवर जाणार का?

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेवर जाणार का?

uddhav-thackeray-vidhan-parishad-election-uday-samant-comment : उदय सामंतांच्या ‘उगाचच धाडस’ टोल्याने राजकीय चर्चांना उधाण

Mumbai: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेवर निवडून जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी विधान परिषदेच्या निवडणुका संख्याबळावर होणार असल्याने, सध्याच्या राजकीय समीकरणात ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे ठाकल्याचे चित्र आहे.

विधान परिषदेची निवडणूक पूर्णपणे आमदारांच्या संख्याबळावर अवलंबून असते. सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीकडे आवश्यक तेवढे संख्याबळ नसल्याने उद्धव ठाकरे यांचा पुन्हा विधान परिषदेत प्रवेश सोपा नसेल, अशी चर्चा राजकीय जाणकारांकडून होत आहे. उपलब्ध गणितानुसार एकूण नऊ जागांपैकी महाविकास आघाडीला केवळ एका जागेवर यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही एकमेव जागा उद्धव ठाकरे स्वतःसाठी राखून ठेवणार की पक्षातील अन्य ज्येष्ठ नेत्याला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ZP Election Winner List : कोकणात महायुतीचा दबदबा!

या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटाला थेट टोला लगावला आहे. विधान परिषदेची निवडणूक ही केवळ संख्याबळावर होते, असे सांगत सामंत यांनी महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा केला. आमच्याकडे २३७ आमदार आहेत, तर समोरच्यांकडे किती आमदार आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे उगाचच कोणी धाडस करणार नाही, अशी टीका त्यांनी केली. सामंत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना अधिकच वेग आला आहे.

सध्याचे संख्याबळ पाहता महायुतीकडे सुमारे २३५ आमदार असून, त्यातून महायुतीचे किमान सात उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, असे बोलले जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे माकप आणि शेकापसह सुमारे ४८ आमदार आहेत, तर शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभेत २० आमदार आहेत. या गणितात जर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) किंवा काँग्रेसला इतर निवडणुकांमध्ये पाठिंबा दिला, तर त्याबदल्यात विधान परिषदेचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ZP Results : १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सत्तेचा आज फैसला

उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेणार की नव्या नेतृत्वाला संधी देणार, तसेच महाविकास आघाडी संख्याबळाची कसर कशी भरून काढणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र, उदय सामंतांच्या टोचणाऱ्या विधानामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीआधीच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

error: Content is protected !!