ZP Election Results : दिग्गज नेत्यांच्या पत्नी, कन्या आणि वारसांचा दबदबा!

zilla-parishad-election-results-2026-relatives-of-prominent-leaders : जिल्हा परिषदेत अनेक ठिकाणी घराण्यांची सत्ता कायम

Mumbai: राज्यातील मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत असून, या निवडणुकांमध्ये अनेक प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांनी मोठे यश मिळवले आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र या संघर्षात अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांच्या पत्नी, कन्या आणि वारसांनी विजय मिळवत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पारगाव जरकवाडी जिल्हा परिषद गटातून त्यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी तिसऱ्या फेरीअखेर २ हजार १३० मतांची निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला. या निकालामुळे आंबेगावमध्ये वळसे-पाटील कुटुंबाचे राजकीय वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर पुरंदर तालुक्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांची कन्या रूपाली झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय संपादन केला आहे. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पंचायत समिती सदस्यही विजयी झाल्याने तालुक्यावर पक्षाची पकड अधिक मजबूत झाली आहे.

ZP Election Results : जिल्हा परिषदेत निकालात ‘या’ ठिकाणी भाजपवर नामुष्की

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गटात माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील वारसाने दणदणीत विजय मिळवला आहे. तानाजी सावंत यांचे पुतणे आणि शिवाजीराव सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत तब्बल ६ हजार ८०० मतांच्या मोठ्या फरकाने प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. याच जिल्ह्यात भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवत राजकीय क्षेत्रात यशस्वी प्रवेश केला आहे.

Sanjay Raut: संघामुळे भाजपला ‘अच्छे दिन’, पण त्याच भाजपच्या सत्तेमुळे अधोगती!

कोकण विभागातही घराण्यांचे वर्चस्व ठळकपणे दिसून आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघातील असगोली जिल्हा परिषद गटातून आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत अखेर ५७१ मतांच्या फरकाने विजय मिळवला. रायगड जिल्ह्यात आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनीही प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे.

या निकालांमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, अनेक ठिकाणी मतदारांनी प्रस्थापित राजकीय कुटुंबांनाच कौल दिल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काळात या निकालांचे पडसाद राज्याच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

___