
vidarbha-is-future-employment-hub : गडकरींनी स्पष्टच सांगितलं, रोजगार कुठेय विचारणाऱ्यांना ‘मिहान’ची यादी देणार
Nagpur “विदर्भातील तरुण मुंबई-पुण्याला नोकरीसाठी का जातात, असा प्रश्न विचारणाऱ्यांना येत्या पाच वर्षांत उत्तर मिळेल. परिस्थिती अशी निर्माण होईल की, खुद्द पुणे आणि मुंबईतील युवक नोकरीच्या शोधात नागपूर-विदर्भात येतील,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘विदर्भात रोजगार कुठे आहे?’ या टीकेला उत्तर दिले.
विदर्भात रोजगार नसल्याच्या आरोपांवर गडकरींनी थेट आकडेवारीच सादर केली. “मिहान प्रकल्पात आजच १ लाख युवकांना रोजगार मिळाला आहे. ज्यांना संशय आहे, त्यांनी यावे, मी त्यांच्या नावाची यादीच देतो,” असे आव्हान गडकरींनी दिले.येत्या पाच वर्षांत विदर्भातील ५ लाख तरुणांना थेट रोजगार देण्याचे उद्दिष्ट असून, वाशीम ते गडचिरोली असा औद्योगिक पट्टा (Industrial Belt) वेगाने विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Nitin Gadkari : गडकरींनी स्पष्टच सांगितलं, साहित्य संघाच्या निवडणुकीशी माझा संबंध नाही
विदर्भाच्या विकासाबाबत बोलताना गडकरींनी भविष्यातील मोठ्या प्रकल्पांची माहिती दिली. ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा विदर्भात विस्तार करत असून, या एकाच कंपनीतून १० हजार तरुणांना काम मिळणार आहे.नक्षलग्रस्त अशी ओळख पुसून गडचिरोली आता ‘स्टील सिटी’ म्हणून उदयाला येत आहे, जे विदर्भाच्या अर्थव्यवस्थेसाठी गेमचेंजर ठरेल.
ZP Election Results : दिग्गज नेत्यांच्या पत्नी, कन्या आणि वारसांचा दबदबा!
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला पायाभूत सुविधांसाठी ८९ हजार कोटींचा निधी मिळणार असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. देशाचा वाहतूक खर्च जो पूर्वी १६ टक्के होता, तो आता कमी होऊन ५-६ टक्क्यांवर आला आहे. यामुळे विदर्भातील उत्पादने स्वस्त होऊन उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे. २० नव्या जलमार्गांना मंजुरी मिळाली असून ‘सी-प्लेन’सारख्या प्रकल्पांमुळे पर्यटनातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतील.
या पत्रकार परिषदेला नवनिर्वाचित महापौर नीता ठाकरे, आमदार कृष्णा खोपडे, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि माजी खासदार अजय संचेती यांची प्रमुख उपस्थिती होती.








