kalmeshwar-coal-to-chemical-project-approved-land-transfer-midc-nagpur : ११७ हेक्टर जमीन मंजूर, ३० हजार तरुणांना मिळणार रोजगाराची संधी
Nagpur विदर्भातील तरुणांसाठी रोजगाराचे नवे दालन उघडण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे प्रस्तावित असलेल्या ‘कोल टू केमिकल’ या प्रकल्पासाठी ११७ हेक्टर (सुमारे २९० एकर) जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (MIDC) हस्तांतरित करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे विदर्भात ३० हजारहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असून, उद्योगांच्या जागतिक नकाशावर विदर्भाचे स्थान अधिक मजबूत होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात नवनवे उद्योग खेचून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विदर्भातील कोळशाचा उपयोग करून त्यापासून रसायने तयार करण्याचा हा प्रकल्प विकासाचा नवा मैलाचा दगड ठरणार आहे. या निर्णयामुळे कळमेश्वर, काटोल आणि नागपूर परिसरातील हजारो तरुणांना नोकरीसाठी आता मुंबई किंवा पुण्याकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही. जमिनीच्या हस्तांतरणातील तांत्रिक अडचणी दूर झाल्यामुळे आता या प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष जमिनीवर सुरू होणार आहे.
नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या ‘ॲडव्हांटेज विदर्भ’ महोत्सवात झालेल्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी आता गतीने सुरू झाली आहे. मिहान प्रकल्पामुळे यापूर्वीच एक लाख युवकांना रोजगार मिळाला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या विस्तारामुळे १० हजार जणांना रोजगार मिळणार असून, आता ‘कोल टू केमिकल’ प्रकल्पामुळे आणखी ३० हजार नोकऱ्यांची भर पडणार आहे.
“येत्या पाच वर्षांत विदर्भातील युवकांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही, उलट इतर शहरांतील युवक रोजगारासाठी विदर्भात येतील,” हा नितीन गडकरी यांचा दावा या निर्णयामुळे सत्यात उतरताना दिसत आहे.








