Only one person per house will be benifited with PM Kisan’s money : केंद्र सरकारची नवीन नियमावली लागू;
Nagpur पीएम किसान PM Kisan योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील अनेक सदस्य लाभ घेत असल्याची प्रकरणे समोर आली होती. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. आता या योजनेचा कुटुंबातील एकालाच लाभ मिळणार आहे. या नियमावलीमुळे अनेक जण अपात्र होणार आहेत.
केंद्र शासनाने फेब्रुवारी २०१९ पासून पीएम किसान योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत सातबारा असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत. पीएम किसान योजनेचे काम पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चालत होते. परंतु, आता नियमात बदल करण्यात आल्याने पीए किसान योजनेचे काम कृषी सहायकाकडे देण्यात आले आहे. त्यानुसार कामकाज केले जात आहे.
दरम्यान, पीएम किसान योजनेमध्ये प्रारंभी अनेकांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये काहीजण कर भरणारे शेतकरी होते. तसेच ज्यांचे आर्थिक उत्पन्न अधिक आहे, त्यांचाही समावेश होता. अशा लाभार्थींना वगळले जाणार आहे. तसेच एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या नियमासह इतर नियमही समाविष्ट करण्यात आले असल्याने अनेकजण अपात्र होणार आहेत.
पीएम किसान योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असलेल्यांना हा लाभ यापुढे मिळणार नाही.
सगळ्याच योजनांवर येणार गंडांतर?
केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांचे एकाच घरात खूप लाभार्थी असल्याची बाब पुढे आली आहे. एवढेच नव्हे तर आर्थिक मिळकत कमी दाखवून गरिबांच्या योजनांवरही अनेक श्रीमंतांनी डल्ला मारला आहे. पण येत्या सहा महिन्यांत सर्व योजनांची चाचणी होणार आहे. त्यात बऱ्याच लोकांचं पितळ उघडं पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.