bjp-decision-on-nagpur-transport-committee-chairman-balya-borkar-vs-bunty-kukde : भाजपमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर नव्या सभापती निवडीकडे लक्ष, उत्सुकता वाढली
Nagpur स्थायी समितीच्या पाठोपाठ नागपूर महापालिकेत परिवहन समिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भाजपचे सत्तापक्षनेते बाल्या बोरकर आणि माजी शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्याकडे मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात परिवहन समितीचे स्टिअरिंग आलटून-पालटून सोपवण्यात आले होते. यावरून दोघांमध्ये मोठे वादही उफाळून आले होते. आता पुन्हा परिवहन समितीची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संदीप जोशी सत्तापक्षनेते आणि प्रवीण दटके महापौर असताना परिवहन समितीचे सभापतिपद बाल्या बोरकर यांना देण्यात आले होते. त्यानंतरच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी ते बंटी कुकडे यांच्याकडे सोपवण्यात आले. मात्र, मध्यंतरी करण्यात आलेल्या फेरफारामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. शेवटी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली होती. त्यांनी बाल्या बोरकर यांना पदावरून हटवून पुन्हा बंटी कुकडे यांच्या हाती स्टिअरिंग दिले होते.
बंटी कुकडे भाजपचे शहराध्यक्ष झाल्यानंतर दोघांमधील वाद पुन्हा उफाळून आला होता. परिवहन समितीच्या माध्यमातून कोणी कोणाच्या जवळचे कर्मचारी नोकरीला लावले, याची जाहीर वाच्यता या वादामुळे झाली होती. हा वाद तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष व विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोडवला होता.
आता बाल्या बोरकर आणि बंटी कुकडे पुन्हा निवडून आले आहेत. बोरकर यांची सत्तापक्षनेतेपदी वर्णी लागल्यामुळे त्यांना पुन्हा वेगळी समिती मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बंटी कुकडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, एकाच नगरसेवकाला वारंवार परिवहन समिती का द्यायची, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
Sudhir Mungantiwar : शिवकार्याचा जागर अन् मुनगंटीवारांचे ऐतिहासिक उपक्रम
महापालिकेची स्थगित सभा येत्या २४ फेब्रुवारीला बोलावण्यात आली आहे. यामध्ये स्थायी समितीच्या १६ सदस्यांसह जलप्रदाय, बांधकाम, आरोग्य, कर आकारणी, अग्निशमन, महिला व बाल कल्याण, स्थापत्य व प्रकल्प, विधी आणि क्रीडा समिती अशा विविध समित्यांची घोषणा केली जाणार आहे.








