Vijay Wadettiwar Pratibha Dhanorkar : चंद्रपूर महापालिकेची सत्ता गमावली, काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांची होणार चौकशी

chandrapur-municipal-corporation-congress-internal-dispute-inquiry-vijay-wadettiwar-pratibha-dhanorkar : वडेट्टीवार-धानोरकर वादाचा फटका; आता दिल्लीत अहवाल सादर होणार

Chandrapur ​चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्यानंतरही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील भांडणे आणि वादामुळे चालून आलेली सत्ता काँग्रेसने गमावली. याची गंभीर दखल पक्षाच्या नेत्यांनी घेतली आहे. या दोन नेत्यांच्या गटबाजीची चौकशी करून प्रदेश काँग्रेसच्या वतीने अहवाल दिल्लीतील नेत्यांकडे पाठवला जाणार आहे. यामुळे चंद्रपूर काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

चंद्रपूरमध्ये महापौर कोणाच्या गटाला द्यायचा यावरून काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद उफाळून आला होता. दोन्ही गटांनी आपापल्या समर्थकांची स्वतंत्र गट नोंदणी केली होती. काँग्रेसमध्ये दोन गट पडताच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तत्काळ झूम मीटिंग घेऊन तोडगा काढला होता. महापौरपद खासदार धानोरकर तर स्थायी समिती व उपमहापौर वडेट्टीवार यांच्या समर्थकांना द्यायचे ठरले होते. सुरुवातीला दोन्ही नेत्यांनी यास होकार दिला होता.

Nagpur municipal corporation : बाल्या की बंटी?; परिवहन समितीचे ‘स्टिअरिंग’ कोणाच्या हाती?

त्यानंतरही अंतर्गत धुसफूस सुरूच होती. एकमेकांचे नगरसेवक या दरम्यान पळवण्याचे प्रकार झाले. शेवटी दिल्लीतील बड्या नेत्यांच्या कोर्टात हा वाद गेला. त्यातही महापौर हा खासदाराला देण्याचे फर्मान काढण्यात आले. खासदारांवर सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ जमा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. निवडणुकीच्या दिवशी दोन्ही नेते एकत्र आल्याचे दिसत होते.

यानंतरही काँग्रेसचा महापौराचा उमेदवार एका मताने पराभूत झाला. सहा नगरसेवक असलेल्या उद्धव सेनेच्या मागणीकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले तसेच दोन अपक्ष निवडून आलेले काँग्रेसचे नगरसेवकही भाजपच्या गोटात गेले.
​चंद्रपूर महापालिका ६६ नगरसेवकांची आहे. काँग्रेसचे २७ जागा तर भाजपचे २३ नगरसेवक निवडून आले होते. बहुमतासाठी ३४ नगरसेवकांचा आकडा गाठण्यासाठी दोन्ही पक्षाला इतर पक्षाच्या नगरसेवकांची आवश्यकता होती.

Nagpur municipal corporation : पंतप्रधान मोदींनी दिलेल्या ई-बसेसचा उपयोग काय?, महापालिकेच्या कारभारावर सवाल

उद्धव ठाकरे सेनेने ६ व वंचित आघाडीचे दोन असे मिळून आठ जणांचा गट स्थापन केला होता. दोन्ही पक्षाची अडचण लक्षात घेऊन उद्धव सेनेने महापौरपदावर दावा केला होता. काँग्रेसने स्थायी समितीचे सभापतिपद त्यांना देऊ केले होते. भाजपने मात्र स्थायी समिती, उपमहापौर तसेच सव्वा वर्षानंतर महापौरपद देण्याचे मान्य केले. त्यामुळे काँग्रेसचे गणित बिघडले. अपक्ष नगरसेवकांना वळवण्याचे काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न केले नाहीत.

Sudhir Mungantiwar : शिवकार्याचा जागर अन् मुनगंटीवारांचे ऐतिहासिक उपक्रम

एमआयएमचा एक नगरसेवक तटस्थ राहिला तर वंचितचे दोन्ही नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यामुळे काँग्रेसची उरलीसुरली आशाही मावळली. भाजपने धक्कादायक विजयाची नोंद केली. काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी वाद निर्माण केला नसता तर चंद्रपूरमध्ये आरामात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली असती असा निष्कर्ष काढला जात आहे. आता काँग्रेसने वडेट्टीवार आणि धानोरकर यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

चौकशी समितीचा अहवाल दिल्लीच्या शीर्षस्थ नेत्याकडे पाठवला जाणार आहे. हे बघता आता या दोन्ही नेत्यांवर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसच्या मुंबईतील टिळक भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आदी नेते प्रामुख्याने उपस्थित होते.