Prakash Bharsakle : आमदार भारसाकळेंना मागितली दोन कोटींची खंडणी?; बिश्नोई गँगच्या नावाने कथित फोन

akola-akot-mla-prakash-bharsakale-alleged-extortion-call-bishnoi-gang-rumors : राजकीय आरोप-प्रत्यारोप, घटनेला अधिकृत दुजोरा नाहीच

Akola अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी वसूल करून देण्याच्या धमकीचा कथित फोन आल्याची चर्चा सोशल मीडियावर आणि काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांत जोर धरू लागली. या कथित फोनचा संदर्भ देत, हा फोन बिश्नोई गँगकडून आल्याचा दावा करण्यात आला. मात्र, या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांकडून अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

त्यामुळे राजकीय वर्तुळात संशय, आरोप-प्रत्यारोप आणि उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे सांगत, भारतीय जनता पार्टीचे अकोट शहराध्यक्ष हरीश टावरी यांना फोन करून आमदार भारसाकळे यांच्याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी वसूल करून देण्याची धमकी दिल्याचा दावा करण्यात आला. मागणी पूर्ण न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचेही काही माध्यमांनी प्रसारित केले. या पार्श्वभूमीवर आमदारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची चर्चा रंगली.

या प्रकरणासंदर्भात पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, “अशा स्वरूपाची कोणतीही अधिकृत तक्रार आमच्याकडे दाखल झालेली नाही. सोशल मीडियावर फिरणाऱ्या माहितीनुसार प्राथमिक चौकशी सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांकडून अधिकृत निवेदन न आल्याने या प्रकरणातील वास्तव अद्याप अस्पष्ट आहे.

Amravati DPC fund : ‘डीपीसी’तील विकासकामात ‘फिक्सिंग’ची चर्चा; ३० निविदा पडून तरीही विलंब

दरम्यान, ज्यांना धमकीचा फोन आल्याचे सांगितले जात आहे, त्या हरीश टावरी यांनी या वृत्ताचे स्पष्ट खंडन केले असून मला कोणताही धमकीचा फोन आलेला नाही, सोशल मीडियावर पसरवली जाणारी माहिती निराधार आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, अकोट शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आमदार प्रकाश भारसाकळे आणि भाजप शहराध्यक्ष हरीश टावरी हे दोघेही अनुपस्थित होते. या अनुपस्थितीमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून संशय अधिक बळावला आहे.

DRDA office : डीआरडीएमध्ये अनधिकृत व्यक्तींचा शिरकाव?

या कथित प्रकरणामुळे अकोट-तेल्हारा परिसरात राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही काही राजकीय वर्तुळांतून केला जात आहे. दुसरीकडे, प्रकरण गंभीर असल्याने याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून आमदार भारसाकळे यांच्या दर्यापूर येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला असल्याची चर्चा आहे. आता या सर्व प्रकरणावर पोलिसांच्या अधिकृत भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.