Ravikant Tupkar : अफू लागवडीच्या धाडींवरून ठिणगी; तुपकरांचा सरकारवर हल्ला

buldhana-opium-cultivation-controversy-ravikant-tupkar-questions-state-government : महाराष्ट्रात अफूवर बंदी का? रोकठोक प्रश्नाने प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Buldhana सोयाबीन आणि कापसाला अपेक्षित भाव न मिळणे, कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्तता न होणे आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आधीच आर्थिक कोंडीत सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष धगधगत असताना, आता ‘अफू’ लागवडीच्या संशयावरून टाकल्या जाणाऱ्या धाडींनी या संघर्षात तेल ओतले आहे.

या संवेदनशील मुद्द्यावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे अत्यंत आक्रमक भूमिका मांडत राज्य सरकारला धारेवर धरले आहे. इतर काही राज्यांत नियमांच्या चौकटीत राहून अफू लागवडीस रितसर परवानगी दिली जाते आणि सरकारी स्तरावर प्लॉट मंजूर केले जातात; मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरच ही बंदी का लादली जाते, असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Rohit pawar : रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्याची कुटुंबीयांची भीती

तुपकर यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून कायदेशीर आणि नैतिक चर्चांना उधाण आले आहे. कायद्याने बंदी असलेल्या पिकाचे समर्थन करणे चुकीचे असून कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे, अशी भूमिका काही राजकीय गटांनी घेतली आहे. तरी शेतकरी वर्गातून तुपकरांच्या प्रश्नाला छुपी साथ मिळताना दिसत आहे. नैसर्गिक आपत्ती, हमीभावाचा अभाव आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे पारंपरिक शेती पूर्णपणे कोलमडली असताना शेतकऱ्यांनी जगावे कसे, असा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.

Bribery line code : मंत्रालयातील ‘रेषांचा गेम’ उघड; एका उभ्या रेषेला ५० हजारांचा दर!

या प्रकरणामुळे शेतकरी धोरण, बाजारव्यवस्था आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी या तिन्ही आघाड्यांवर आता मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. बुलढाण्यातील या ‘अफू’ प्रकरणाने आता राज्यस्तरावरील नेत्यांचेही लक्ष वेधले असून, यावर शासन काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.