MLA-sanjay-kute-denied-entry-without-pass : राष्ट्रपतींच्या दौऱ्यात संजय कुटे यांना थांबवले, पास आणल्यावरच सोडले
Shegao दोनच दिवसांपूर्वी भाजपने राज्याच्या कार्यकारीणीत स्थान मिळालेले आमदार संजय कुटे एका घटनेमुळे चांगलेच चर्चेत आले. राष्ट्रपतींच्या दौऱ्यात पास नसल्यामुळे त्यांना काही क्षण ताटकळत बसावे लागले. त्यांना पास दाखविल्यानंतरच एन्ट्री मिळाली. या घटनेची काही तास चांगलीच चर्चा रंगली.
द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन पार पडताना शहरात अभूतपूर्व कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे प्रत्येक प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स, वाहनांची तपासणी आणि ओळखपत्रांची काटेकोर पडताळणी सुरू होती.
Nitin Raut: ३२ सरकारी नोकऱ्यांसाठी लाखो झाडांची कत्तल करायची का?
या कडक सुरक्षा व्यवस्थेचा अनुभव थेट लोकप्रतिनिधींनाही घ्यावा लागल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली. आमदार डॉ. संजय कुटे कार्यक्रमस्थळी पोहोचले असता, प्रवेशद्वारावरील सुरक्षाकर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवत अधिकृत ‘पास’ची मागणी केली. गळ्यात आमदारांचे ओळखपत्र असतानाही “पास दाखवा” अशी ठाम भूमिका घेतल्याने क्षणभर उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त झाले. त्यानंतर त्यांच्या सहाय्यकाने वाहनातून प्रवेश पास आणल्यानंतरच त्यांना आत प्रवेश देण्यात आला.
या घटनेनंतर “राष्ट्रपतींच्या सुरक्षेपुढे पद किंवा प्रतिष्ठा चालत नाही,” अशी चर्चा रंगली. काहींना प्रक्रियेमुळे क्षणिक गैरसोय वाटली; मात्र सुरक्षा यंत्रणेचा शिस्तबद्ध आणि नियमांनुसार असलेला कडकपणा पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यात सुरक्षा यंत्रणा कोणतीही तडजोड न करता नियमांची अंमलबजावणी करते, याचे हे ठळक उदाहरण ठरले. या प्रसंगामुळे कार्यक्रमाच्या राजकीय रंगतिला वेग आला असला, तरी सुरक्षा व्यवस्थेचा संदेश स्पष्ट होता—नियम सर्वांसाठी समान.








