leopard in city : आता वाघ, बिबट्या गावात येताच ‘एआय’ करणार अलर्ट

AI-alert-if-tiger-leopard-enters-in-town : नागपूर वन विभाग आणि ग्रामीण पोलिसांचा प्रयोग

Nagpur अलीकडे वाघ आणि बिबट्या गावात येण्याचे प्रकार वाढले आहे. नागपूरसारख्या वर्दळीच्या शहरातील बिबट्या घुसला होता. आता वाघ व बिबट्या शिरण्याची समस्या फक्त वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये राहिली नाही. वन्यप्राण्यांचाय हल्ल्यात होणारी जीवितहानी रोखण्यासाठी नागपूर वन विभाग आणि ग्रामीण पोलिसांनी तंत्रज्ञानाचे मोठे पाऊल उचलले आहे.

‘एआय’ आधारित विशेष सतर्कता यंत्रणा नागपूर ग्रामीण भागात तीन ठिकाणी यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली असून, पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळील पिपरिया येथे या यंत्रणेने वाघाचा वावर असल्याचा इशाराही (अलर्ट) दिला आहे. १५ एप्रिलपर्यंत संवेदनशील अशा ४० गावांमध्ये ही यंत्रणा उभारली जाणार आहे.

नागपूर ग्रामीण भागात गेल्या अडीच ते तीन वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १५ गावकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळून अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मार्व्हल’ या संस्थेच्या मदतीने ही ‘एआय’ यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

Vipin Itankar : कोण म्हणतं सिलिंडरची टंचाई आहे, एकही हॉटेल बंद पडले नाही

वाघ किंवा बिबट्या परिसरात आल्यास चितळ, सांबर, माकड आणि मोर विशिष्ट प्रकारचे आवाज काढून धोक्याचा इशारा देतात. हे ‘एआय’ तंत्रज्ञान प्राण्यांचे ते विशिष्ट आवाज टिपते आणि डेटाचे विश्लेषण करून तातडीने वन विभाग व गावकऱ्यांच्या मोबाईलवर सतर्कतेचा संदेश पाठवते.

जंगलात लावलेल्या उच्च क्षमतेच्या अत्याधुनिक कॅमेऱ्यांमध्ये हिंस्त्र प्राण्यांची हालचाल टिपली जाताच, यंत्रणा त्याचे फोटो ‘कॅप्चर’ करते आणि संबंधित अधिकार्यांना सावध करते. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेंच व्याघ्र प्रकल्पासह खापा आणि पारशिवनी या प्रादेशिक वनविभागातील संवेदनशील ४० ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या आठवड्यात तीन ठिकाणी ही यंत्रणा प्रत्यक्षात सुरू झाली असून, गेल्या चार दिवसांत दोनदा वाघ आणि बिबट्यांच्या हालचालींचे अचूक इशारे गावकऱ्यांना मिळाले आहेत.

Maoist arrested : दोन दशकांपासून यंत्रणेला चकवा देणारा नक्षलवादी कमांडर मृत्युंजय अखेर जेरबंद

नागपूर ग्रामीणमधील यशस्वी प्रयोगानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातही ही ‘एआय’ यंत्रणा उभारली जाणार आहे. यासाठी वन विभाग आणि ‘मार्व्हल’ संस्था यांच्यात सामंजस्य करार झाल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.