Sudhir mungantiwar : चंद्रपूर रिंग रोडसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत ठोस मागणी

chandrapur-ring-road-demand-sudhir-mungantiwar-assembly-discussion : प्रकल्पाला गती देण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आश्वासन

Mumbai : चंद्रपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची वाढती संख्या आणि औद्योगिक वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता चंद्रपूरसाठी स्वतंत्र रिंग रोड उभारण्याची ठोस मागणी माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. सभागृहातील अर्धा तास चर्चेदरम्यान त्यांनी या प्रकल्पाची गरज अधोरेखित करत शहराच्या भविष्यातील विकासासाठी रिंग रोड अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. या मागणीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने सकारात्मक भूमिका घेत लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून हा प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मंत्री शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले यांनी दिले.

माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितले की चंद्रपूर शहराची लोकसंख्या सुमारे ४.७९ लाख असून शहराचा साक्षरता दर ८९.४५ टक्के आहे. जिल्ह्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प, सिमेंट उद्योग, कोळसा खाणी आणि मोठ्या प्रमाणावर होणारी मालवाहतूक यामुळे शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा होत असते. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण वाढत असून अपघातांची संख्या चिंताजनकरीत्या वाढत आहे. २०२४-२५ या कालावधीत जवळपास ९०० अपघातांची नोंद झाली असून त्यामध्ये ४३० नागरिकांचा मृत्यू झाला तर सुमारे ८०० जण जखमी झाले आहेत. चालू वर्षातही अपघातांची संख्या वाढत असल्याने वाहतूक व्यवस्थापनासाठी रिंग रोड अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

ladki-bahin-yojana : लाडकी बहीण योजनेच्या बजेटमध्ये ९५०० कोटींची घट

चंद्रपूर हे औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होणारे शहर असल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प, सिमेंट उद्योग आणि कोळसा खाणींमुळे मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक शहरातून होत असल्याचे सांगितले. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा मिळावी तसेच औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी नियोजनबद्ध रिंग रोड उभारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर-चंद्रपूर तसेच बल्लारपूर-राजुरा-तेलंगणा मार्गावरील मोठ्या प्रमाणातील वाहतूक शहरातून जात असल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर चेकबोर्डा, मोरवा, बाबूपेठ आणि जुनोना या मार्गावर चार ते सहा पदरी रिंग रोड विकसित करावा अशी सूचना त्यांनी केली. हा रिंग रोड आधुनिक, हरित आणि स्मार्ट संकल्पनेवर आधारित असावा तसेच सौर उर्जेचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी सभागृहात मांडली.

या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून काम हाती घेऊन तीन महिन्यांच्या आत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, प्रकल्पासाठी स्वतंत्र कार्यकारी अभियंता नेमावा तसेच यासंदर्भात मुंबईत लवकरात लवकर बैठक आयोजित करावी अशी मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली. “रस्ते केवळ अंतर कमी करत नाहीत, ते विकासाची गाथा लिहितात. चंद्रपूरचा रिंग रोड हा जिल्ह्याच्या भविष्यातील प्रगतीचा मार्ग ठरेल,” असेही त्यांनी सभागृहात नमूद केले.

leopard in city : आता वाघ, बिबट्या गावात येताच ‘एआय’ करणार अलर्ट

यावर उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले यांनी सांगितले की चंद्रपूरमधून दोन राष्ट्रीय महामार्ग जात असून औद्योगिक वाहतुकीमुळे रिंग रोडची गरज वास्तव आहे. या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच मुंबईत यासंदर्भात बैठक घेण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रकल्पाबाबत सकारात्मक असून संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने हा प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले.