Water crisis : ११३ कोटीची योजना, तरीही दोन वस्त्या कोरड्याच!

inspite-113-crores-scheme-ramnagar-buldhana-facing-water-shortage : बुलढाण्यात ‘पाण्याचं राजकारण’, रामनगरवासीयांच्या वाट्याला टंचाई

Buldhana शहरासाठी तब्बल ११३ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबवून मोठा गाजावाजा करण्यात आला. वर्षानुवर्षे प्रतीक्षा केल्यानंतर ही योजना आता पूर्णत्वास आल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात काही भागांमध्ये अद्यापही पाण्याचा थेंब पोहोचत नसल्याची धक्कादायक स्थिती समोर आली आहे. त्यामुळे शहरात आता “पाण्यावरही राजकारण सुरू झाले का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या योजनेअंतर्गत शहरातील अनेक भागांत नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे राहत असलेल्या परिसरातील रामनगर भागातील दोन गल्ल्यांमध्ये नव्या जलवाहिनीला अजूनही पाणी पोहोचलेले नाही. विशेष म्हणजे याच परिसरातील जवळच असलेल्या एका पाळणाघराच्या तिसऱ्या मजल्यावर कोणतीही मोटार न लावता पाणी सहज पोहोचत आहे; परंतु रामनगरमधील नागरिकांना मात्र मोटार लावूनही पाण्याचा थेंब मिळत नसल्याने संताप वाढत आहे.

Sudhir mungantiwar : नवीन चंद्रपूरच्या पायाभूत विकासासाठी मुनगंटीवारांची अभ्यासू मांडणी; सरकारकडे जोरदार पाठपुरावा

या भागातून पालिकेत सत्ताधारी शिंदेसेनेचे दोन नगरसेवक निवडून आलेले असतानाही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे पालिकेतील प्रशासन नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या मते, “झाले… होईल… लवकरच पाणी येईल,” अशी आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात गल्ल्यांमध्ये खोदलेले खड्डे तसेच राहिले असून पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम आहे.

दरम्यान, या समस्येमुळे संतप्त नागरिकांनी नगराध्यक्षांसह आमदार संजय गायकवाड यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “किमान पाण्यासारख्या मूलभूत गरजेत तरी राजकारण करू नका,” असा संदेश नागरिकांनी लोकप्रतिनिधींना दिल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

Sudhir mungantiwar : चंद्रपूरच्या ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा !

मोठ्या खर्चाची योजना पूर्ण झाल्याचा दावा होत असताना शहरातील काही गल्ल्या अजूनही कोरड्या राहत असतील, तर या योजनेची अंमलबजावणी नेमकी कशी झाली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या या वादामुळे बुलढाण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.