Drone attack threat: कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रे उडवून देण्याची धमकी; परिसरात हायअलर्ट

Threat to blow up the Koradi and Khaparkheda thermal power plants : अज्ञात ई-मेलद्वारे ड्रोन हल्ला करण्याची धमकी, जिल्ह्यामध्ये खळबळ

Nagpur नागपूर जिल्ह्यातील ऊर्जा निर्मितीचे मुख्य स्रोत असलेली कोराडी आणि खापरखेडा ही दोन महत्त्वाची औष्णिक विद्युत केंद्रे ड्रोन हल्ला करून उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात ई-मेलद्वारे मिळालेल्या या धमकीमुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यात आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने तत्काळ गंभीर दखल घेतली असून, दोन्ही प्रकल्पांच्या परिसरात तातडीने शोधमोहीम राबवण्यात आली आहे.
धमकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही विद्युत केंद्रांच्या सभोवताल कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रकल्पांच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि संवेदनशील ठिकाणी बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात आले असून, आत जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची कसून तपासणी केली जात आहे. खबरदारी म्हणून प्रकल्पांसमोरील मार्गावरील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली आहे.
प्राथमिक तपासानुसार, हा धमकीचा ई-मेल दक्षिण भारतातून आल्याची माहिती समोर येत आहे. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असून, संबंधित ई-मेलचा आयडी बनावट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या सायबर पोलीस या ई-मेलच्या मूळ स्रोताचा आणि तो पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Big blow to UBT : अकोल्यात शिवसेनेत मोठी फूट; उद्धव गटाचे पाच नगरसेवक शिंदे गटात

अद्याप पोलिसांच्या हाती कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. मागील आठवड्यात मुंबईतील विधानभवन आणि रिझर्व्ह बँक उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. आता नागपुरातील कोराडी, खापरखेडा आणि अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक विद्युत केंद्रालाही लक्ष्य करण्याची धमकी मिळाल्याने चिंता व्यक्त होत आहे. हा प्रकार एखाद्या व्यक्तीचा खोडसाळपणा असावा असाही एक प्राथमिक तर्क लावला जात आहे. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेचा आणि वीज पुरवठ्याचा प्रश्न असल्याने पोलीस कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायला तयार नाहीत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.