1252-farmers-suicides-in-last-decade : धोरणे अपुरी, संकट कायम; बुलढाण्यात आत्महत्यांचा आकडा वाढताच
Buldhana शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न आजही केवळ आकडेवारीपुरता मर्यादित राहिला असून, शासनाच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होते; मात्र उपाययोजना अद्यापही अपुऱ्या ठरत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत तब्बल १,२५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. म्हणजे दरवर्षी सरासरी १२५, तर दरमहा १० ते ११ शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. ही केवळ अधिकृत आकडेवारी असून, अपात्र ठरवलेल्या प्रकरणांचा समावेश नसल्याने प्रत्यक्ष आकडा यापेक्षा अधिक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Amol Mitkari : अकोल्यातील अघोरी पुजेचा अजित पवारांच्या अपघाताशी संबंध?
कर्जबाजारीपणा, पिकांचे नुकसान आणि वाढता मानसिक ताण ही आत्महत्यांची प्रमुख कारणे अजूनही कायम आहेत. कापूस व सोयाबीनसारख्या नगदी पिकांवर अवलंबून असलेल्या जिल्ह्यात अनिश्चित पाऊस, वाढता उत्पादन खर्च आणि हमीभावातील अस्थिरता यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडत आहेत. परिणामी, तरुण शेतकऱ्यांमध्येही नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, तीन दशकांहून अधिक काळ उलटल्यानंतरही परिस्थितीत ठोस बदल का झाला नाही? कर्जमाफी, अनुदाने आणि योजना यांचा गाजावाजा होत असला तरी शेतकऱ्यांच्या जीवनात अपेक्षित सुधारणा दिसत नाही. त्यामुळे ‘स्मृतिदिन’ हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, ठोस धोरणात्मक निर्णयांचा दिवस ठरायला हवा, अशी मागणी जोर धरत आहे.
Gopikishan bajoria : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान खपवून घेणार नाही
शेतकरी आत्महत्यांमागील कारणे जुनीच असली तरी ती अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. सिंचनाचा अभाव, बाजारातील अनिश्चितता आणि वाढता खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. आता सरकारने केवळ सहानुभूती न दाखवता ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविल्या नाहीत, तर हे मृत्यूचक्र थांबण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत.








