Protest demanding cancellation of FRS and grant of government status : बुलढाण्यात अंगणवाडी सेविकांचे शक्तिप्रदर्शन; केंद्र सरकारविरोधात आवाज
Buldhana अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्या व फेस रिकग्निशन सिस्टीम (FRS) विरोधात एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात रोष व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात अंगणवाडी सेवांमध्ये अनिवार्य करण्यात आलेल्या फेस रिकग्निशन सिस्टीममुळे निर्माण झालेल्या अडचणींवर विशेष भर देण्यात आला. तांत्रिक त्रुटी, नेटवर्क समस्या तसेच लाभार्थ्यांकडे स्मार्टफोन सुविधेचा अभाव यामुळे अनेक पात्र लाभार्थी पोषण आहार व रेशनपासून वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात आला.
Band artists : ‘डीजे बंद करा’ची मागणी; बँड कलाकारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
तसेच निकृष्ट दर्जाचा ‘टेक होम रेशन’ (THR) पुरवठा तात्काळ बंद करून त्याऐवजी ताजे शिजवलेले अन्न किंवा दर्जेदार धान्य पॅकेट्स देण्याची मागणी करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन नियमित वेतनश्रेणी लागू करावी, ग्रॅच्युइटी, पेन्शन, भविष्य निर्वाह निधी (PF) यांसारखे लाभ देण्यात यावेत, तसेच मानधनात वाढ करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.याशिवाय नवीन केंद्रांना मान्यता देणे, विमा योजना लागू करणे आणि टॅबलेटसारख्या डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या माध्यमातून शासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.








