Internal conflicts in BJP for zone heads, mini mayors : नागपूर महापालिकेत भाजपच्या प्रभाग फेरफार राजकरणाने विरोधक आक्रमक
Nagpur नागपूर महानगरपालिकेत १०३ नगरसेवकांसह निर्विवाद सत्ता मिळवल्यानंतरही भाजपचे समाधान झालेले नाही. सर्व महत्त्वाच्या समित्या ताब्यात असताना आता दहाही झोनवर आपलेच वर्चस्व असावे, यासाठी सत्ताधाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. काही प्रभागांचे झोन बदलून राजकीय समीकरणे आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप होत असून, यावरून महापालिकेत मोठा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
नागपूर महापालिकेत एकूण १० झोन आहेत. त्यापैकी ८ झोनमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. मात्र, पश्चिम आणि उत्तर नागपुरातील मंगळवारी आणि आशीनगर या दोन झोनमध्ये काँग्रेस, एमआयएम आणि मुस्लिम लीगचे संख्याबळ जास्त आहे.
Sudhir Mungantiwar: चंद्रपूरच्या विकासाचा बुलंद आवाज: विधानसभेत मुनगंटीवारांचा ‘परिणामकारक’ लढा
मंगळवारी झोनमध्ये काँग्रेसचे ११, तर भाजपचे फक्त ५ नगरसेवक आहेत.
आशीनगर झोन येथे एमआयएम, मुस्लिम लीग आणि काँग्रेसच्या युतीतून ‘मुस्लिम बहुजन विकास आघाडी’चा सभापती होण्याच्या हालचाली आहेत. हे दोन झोन हातातून जाऊ नयेत, यासाठी भाजपने प्रभागांची अदलाबदल करण्याचे धोरण आखले आहे. मंगळवारी झोनमध्ये धरमपेठ परिसरातील भाजपचा प्रभाग १२ जोडण्याची तयारी सुरू आहे, जेणेकरून भाजपचे संख्याबळ वाढून विरोधी पक्षाचा सभापती रोखता येईल.
महापालिका प्रशासनाने या बदलांमागे प्रशासकीय सोय असल्याचे कारण दिले आहे. मात्र, विरोधकांच्या मते हा केवळ सत्ताधाऱ्यांचा राजकीय खटाटोप आहे. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सभेत उपसूचनेसह या बदलांना मंजुरी देण्यात आली. या प्रक्रियेत विरोधी पक्षांना पूर्णपणे अंधारात ठेवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी केला आहे.
illegal money lending : अकोल्यात अवैध सावकारीवर मोठी कारवाई; १६ ठिकाणी एकाचवेळी धाड
सत्ताधारी भाजपला फायदा पोहोचवण्यासाठी प्रशासन दबावाखाली काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. झोन सभापतींच्या नियुक्त्या जाणीवपूर्वक रोखून धरल्याचा आरोप करत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी आता रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेतला आहे. भाजपचे हे फेरफार राजकारण हाणून पाडण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, आगामी काळात महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे.








