mumbai-versova-hair-cut-assault-girlfriend-jealousy-crime-news-marathi : मध्यरात्रीचा धक्कादायक प्रकार; ‘हेअर नो हेअर’ व्हिडीओची धमकी
Mumbai: मुंबईतील वर्सोवा परिसरात एका तरुणीवर मध्यरात्री घरात घुसून हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराने दुसऱ्या तरुणीच्या केसांचे कौतुक केल्याच्या संशयातून संतप्त झालेल्या प्रेयसीने आपल्या मैत्रिणींसह थेट पीडितेच्या घरी घुसून तिचे केस कापल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी २१ वर्षीय आरोपी तरुणीसह तिच्या तीन मैत्रिणींवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणीची ओळख काही काळापूर्वी आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकराशी झाली होती. आरोपीचा प्रियकर सोशल मीडियावरून पीडितेच्या संपर्कात होता. या दरम्यान त्याने पीडितेच्या केसांचे कौतुक आपल्या प्रेयसीसमोर केल्याने तिच्या मनात संशय निर्माण झाला. “मी तुझ्या मैत्रिणीला भेटायला जाणार आहे,” असे प्रियकराने सांगितल्याने आरोपी अधिकच संतप्त झाली होती.
Sushant dalvi : कणकवलीत बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा संशयास्पद मृत्यू
७ मार्च रोजी आरोपी तरुणीने पीडितेचा मोबाईल तपासून पाहिला होता, मात्र त्यावेळी कोणतीही संशयास्पद माहिती आढळली नव्हती. तरीही मनात राग धरून तिने २५ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलले. आईस्क्रीम डिलिव्हरी आली असावी असा समज करून पीडितेने दरवाजा उघडताच आरोपीने तिला बाहेर ओढले आणि कात्रीने तिचे केस कापण्यास सुरुवात केली.
या घटनेदरम्यान आरोपीसोबत आलेल्या तिच्या मैत्रिणींनी संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला. केस कापल्यानंतर “हेअर, नो हेअर” असे म्हणत हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली. इतकेच नव्हे तर कापलेले काही केस आरोपीने सोबत घेऊन ती तेथून पसार झाली. पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर इमारतीतील नागरिक घटनास्थळी जमा झाले, मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाल्या होत्या.
पीडित तरुणीने वर्सोवा पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात प्रियकर आणि पीडित यांच्यातील संबंधांच्या संशयातून हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. आरोपी आणि तिच्या मैत्रिणींनी विनापरवानगी घरात प्रवेश करून हा प्रकार केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
Ashok kharat case : अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; एसआयटी तपासात धक्कादायक बाबी उघड
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सोशल मीडियावरही या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे.








