buldhana waiting for industrial development, employment : बुलढाण्यात रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर; बेरोजगार तरुण हवालदिल
Buldhana उद्योगविकासाच्या बाबतीत बुलढाणा जिल्हा अजूनही मागेच असल्याचे वास्तव पुन्हा एकदा ठळकपणे समोर येत आहे. परिणामी, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या शोधात ‘बाहेरगावची एक्स्प्रेस’ पकडावी लागत असून, हा मुद्दा आता केवळ आर्थिक नव्हे तर राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.
जळगाव जामोद मतदारसंघात उद्योग उभारणीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. आमदार डॉ. संजय कुटे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे मार्ग, जिगाव प्रकल्प यांचा उल्लेख करत उद्योगवाढीची अपेक्षा व्यक्त केली. ‘आता तरी उद्योग येतील’ असा विश्वास त्यांनी मांडला असला, तरी स्थानिक पातळीवर मात्र याबाबत शंका आणि नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
Malkapur Municipal council : दुसऱ्याच सभेत २२५ ठराव, विकासकामांचा वर्षाव की देखावा?
गेल्या काही वर्षांत ‘लवकरच उद्योग येणार’ अशा घोषणा वारंवार करण्यात आल्या. मात्र या घोषणा प्रत्यक्षात उतरल्या नाहीत, अशी टीका नागरिकांमधून होत आहे. परिणामी, उद्योगांच्या नावावर केवळ कागदी घोडेच नाचत असल्याची भावना बळावत चालली आहे. ‘रेल्वे येईल, पाणी येईल… पण उद्योग कधी येणार?’ हा थेट सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.
सध्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहता, आश्वासनांचे कारखाने मात्र जोमात सुरू असल्याचे चित्र आहे; पण प्रत्यक्ष उद्योगधंद्यांची चिमणी अजूनही धूर सोडताना दिसत नाही. त्यामुळे विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवरही चर्चा रंगू लागली आहे.
विशेषतः, रोजगारनिर्मितीचा ठोस आराखडा न साकारल्यास येत्या काळात युवकांचा असंतोष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामधील तफावत कमी करण्याची जबाबदारी शासनावर असल्याचे मत व्यक्त होत आहे.








