drugs ordered from porter app in pune, four arrested : पुणे पोलिसांची धडक कारवाई, चौघांच्या मुसक्या आवळल्या
Pune विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील वारजे परिसरात एका डिलिव्हरी अॅपच्या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘Porter’ या डिलिव्हरी अॅपचा वापर करून वारजे आणि उत्तमनगर परिसरात ‘एमडी’ (मेफेड्रोन) या अमली पदार्थाची विक्री केली जात होती. विशेष म्हणजे, या प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी सुनील राठोड हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या माध्यमातून हे संपूर्ण जाळं चालवलं जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या टोळीने अत्यंत चतुराईने डिलिव्हरी सेवांचा वापर करून ग्राहकांपर्यंत ड्रग्स पोहोचवण्याची पद्धत अवलंबली होती. पोलिस तपासात आतापर्यंत सुमारे ३०० जणांना या अमली पदार्थांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींकडून काही प्रमाणात एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले असून, या मागे मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Vidhan parishad election : विधान परिषद निवडणुकीची चाहूल; ९ जागांसाठी हालचालींना वेग
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंमली पदार्थविरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच इतर भागातही अशाप्रकारे अमली पदार्थांची विक्री केली जाते का? याचाही शोध घेतला जातो आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अमली पदार्थांची विक्री करण्याचे प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.








