district administration allegedly runs only on specific recommendations : ‘कॉलवर काम’ करणाऱ्यांचा सत्कार; विशिष्ट शिफारशींना महत्त्व
Buldhana जिल्ह्यात सध्या प्रशासन आणि राजकारणाच्या वर्तुळात एका नव्या ‘ट्रेंड’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘आकांचा कॉल आला की काम पक्कं!’ अशी चर्चा काही शासकीय कार्यालयांबाबत रंगू लागल्याने नियमांपेक्षा फोनवरील शिफारशींनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचा सूर उमटत आहे.
काही कार्यालयांमध्ये एखाद्या फाईलवरील नियम, कागदपत्रे किंवा पात्रता तपासण्यापूर्वी फोन कुणाचा आहे, हे पाहिले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिक रांगेत तासन्तास थांबत असताना ‘वरदहस्त’ असलेली कामे मात्र थेट अधिकाऱ्यांच्या टेबलावर पोहोचतात, अशी टीकाही दबक्या आवाजात होत आहे.
Makrand Patil : आबा, इकडेही लक्ष द्या हो! वर्ष उलटले, १४ गावांचा पाणीप्रश्न ‘जैसे थे’
या सर्व घडामोडींना आता एका नव्या वळणाने अधिकच राजकीय रंग चढला आहे. ‘विशेष कॉल’वर तत्काळ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार, अशी घोषणा समोर आल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा सत्कार खरोखरच कार्यतत्परतेचा गौरव आहे की प्रशासनातील फोनशाहीवर मारलेला उपरोधिक टोला, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, मार्चअखेर विविध विभागांमध्ये झालेला ‘तडाखेबाज खर्च’ आणि त्यामागील घाईगडबडही या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी खर्च करण्यासाठी वाढलेली लगबग, त्यात काही ठिकाणी झालेली फोनवरील हालचाल आणि फाईल्सच्या मंजुरीतील वेग यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Akash Fundkar : फुंडकरांचा अकोल्यात ‘जनता दरबार’, खामगावात का नाही?
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने ‘आकांच्या कॉल’वर लोकसेवेचा ‘रोल’ करणाऱ्यांचा थेट सत्कार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयामुळे प्रशासनातील कार्यपद्धतीवर राजकीय पातळीवरून थेट बोट ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
‘कामासाठी नियम की कॉल?’ हा प्रश्न आता उघडपणे विचारला जाऊ लागला आहे. मात्र या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे अजूनही अधिकृत नोंदीत नव्हे, तर ‘फोनवरच’ मिळत असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे.








