maharashtra-ias-officers-transfer-11-officers-shweta-singhal-maharashtra-sadan-delhi : आणखी ११ अधिकाऱ्यांचे खांदेपालट, श्वेता सिंघल यांची दिल्लीत नियुक्ती
Mumbai: महाराष्ट्रात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरूच असून सामान्य प्रशासन विभागाने आणखी ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. काही दिवसांपूर्वीच २५ अधिकाऱ्यांचे खांदेपालट करण्यात आले होते, त्यानंतर आता पुन्हा नव्या बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. या बदल्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
या आदेशानुसार राहुल रंजन महिवाल यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथील व्यवस्थापकीय संचालक पदावरून महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. तर श्वेता सिंघल यांची विशेष निवासी आयुक्त म्हणून नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे नियुक्ती करण्यात आली आहे, ही बदली विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
America iran ceasefire : अमेरिका–इराण तणावात मोठा दिलासा; दोन आठवड्यांच्या युद्धविराम !
तसेच रुचेश जयवंशी यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कन्हूराज बागटे यांना महाडिस्कॉम, कल्याण येथे सहव्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय लक्ष्मण राऊत यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातून महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे, तर गीतांजली बाविस्कर यांची खादी ग्राम उद्योग मंडळातून मंत्रालयातील नियोजन विभागात सहसचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.
दरम्यान डॉ. दिलीप जगदाळे यांना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात सहसचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली असून पंकज देवरे यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई येथे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याचबरोबर मीनल करनवाल यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा), मुंबई येथे प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. करिश्मा नायर यांना नाशिक महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदावरून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Eknath shinde : शिंदेंच्या शिवसेनेत लवकरच मोठ्या फेरबदलाची शक्यता !
तसेच अमित रंजन यांची यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी पदावरून नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या सलग बदल्यांमुळे राज्यातील प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल होत असून विविध विभागांमध्ये कार्यक्षमतेला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. आगामी काळातही अशा बदल्यांची शक्यता वर्तवली जात असून प्रशासकीय यंत्रणेत गतिमानता आणण्यावर भर दिला जात आहे.








