baramati-bypoll-55-candidates-sunetra-pawar-bjp-support-devendra-fadnavis : सुनेत्रा पवारांना भाजपचा पाठिंबा, देवेंद्र फडणवीसांचा ठाम शब्द
Baramati : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीने अनपेक्षित वळण घेतले असून सुरुवातीला बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना आता ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासमोर तब्बल ५५ उमेदवार रिंगणात उतरले असून त्यामुळे लढत अधिकच रंगतदार झाली आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट निर्माण होईल आणि निवडणूक बिनविरोध पार पडेल, असा महायुतीचा अंदाज होता. मात्र काँग्रेसनेही मैदानात उतरत ही निवडणूक सरळ लढतीत बदलली आहे. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली असून धनगर समाजाच्या समीकरणांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत फडणवीस यांनी भाजपकडून ठाम पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. बारामतीच्या पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि त्यांच्या विजयासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असा शब्द त्यांनी दिल्याचे समजते.
Rbi repo rate : आरबीआयचा मोठा निर्णय; रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम
या भेटीदरम्यान राज्यसभा खासदार पार्थ पवार हेही उपस्थित होते. त्यांनी काँग्रेसच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेसच्या अधोगतीची ही सुरुवात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.
सुनेत्रा पवार यांनी ६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला असून बारामतीतील राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी ही पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता.
या पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत करुणा मुंडे आणि बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांसारख्या उमेदवारांचाही समावेश असल्याने निवडणूक अधिकच चर्चेत आली आहे. एकूणच बारामतीची ही पोटनिवडणूक आता केवळ औपचारिकता न राहता प्रतिष्ठेची लढत बनली असून आगामी निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.








