Vanchit Bahujan Yuva Aghadi opposes the PPP model for Zilla Parishad schools : जिल्हा परिषद शाळेच्या पीपीपी मॉडेलला वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध
Akola क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जन्मगाव खानवडी येथे जिल्हा परिषद शाळा सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर चालवण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीने तीव्र निषेध नोंदवित ‘शिक्षण क्षेत्रात कंपनी राज आणण्याचा प्रयत्न’ असल्याचा आरोप केला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या खानवडी येथील ‘जोती-सावित्री’ शाळा ‘क्रिस्टल हाउस इंडिया’ या खासगी कंपनीमार्फत चालवली जाणार आहे. राज्यातील ही पहिलीच पीपीपी तत्त्वावरील शाळा असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिक्षणाचे खासगीकरण होत असल्याची टीका संघटनेकडून करण्यात आली आहे.
Aple sarkar kendra : ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची सखोल पडताळणी; १०८ केंद्रांवर कारवाई
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी या शाळेचे उद्घाटन होणार आहे. मात्र, फुले यांच्या विचारांच्या भूमीत शिक्षणाचे व्यापारीकरण करणे हा त्यांच्या वारशाचा अपमान असल्याचे वंचित बहुजन युवा आघाडीचे म्हणणे आहे.
संघटनेच्या मते, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा विचार देणाऱ्या या मातीत शिक्षण क्षेत्र खासगी कंपन्यांच्या हाती देणे धोकादायक आहे. या प्रक्रियेत आरक्षणाच्या धोरणांना बगल दिली जाऊ शकते, तसेच शिक्षक भरती व शाळा व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे गेल्यास सामाजिक न्यायाच्या तत्वांना धक्का बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
Vikas Thakre : विकास ठाकरेंची ‘इनिंग’ संपणार? शहर काँग्रेसच्या नव्या ‘कॅप्टन’साठी निरीक्षक नागपुरात!
याशिवाय, अशा धोरणामुळे जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागाचे अस्तित्व धोक्यात येईल आणि शिक्षण व्यवस्थेचे खाजगीकरण वाढीस लागेल, असा आरोपही करण्यात आला आहे. गरीब व सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा हा निर्णय असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी पीपीपी मॉडेलचा कडाडून विरोध करत हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. सरकारने निर्णय मागे घेतला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.








