chandrapur-bjp-mla-kishor-jorgewar-supports-congress-municipal-election-controversy : आमदार गटाकडून काँग्रेसला उघड मदत, राजकीय समीकरणे ढवळून निघाली
Chandrapur : महापालिकेतील महिला व बाल कल्याण समिती तसेच झोन सभापती निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून पक्षाचेच आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थक नगरसेवकांनी काँग्रेसला उघडपणे मदत केल्याचा आरोप होत आहे. या घडामोडींमुळे भाजपचा पराभव झाला असून काँग्रेसने महत्त्वाच्या पदांवर विजय मिळवला आहे. परिणामी चंद्रपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून जोरगेवार यांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महापालिकेत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या संगीता भोयर यांनी भाजपच्या सुनिता जयस्वाल यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. या निर्णायक टप्प्यावर काही नगरसेवकांच्या भूमिकेमुळे निकाल पलटल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, शिंदे गटाच्या नगरसेविका गैरहजर राहिल्याने काँग्रेसला फायदा झाल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीपूर्वी भाजपच्या बाजूने असलेले काही सदस्य अचानक निष्क्रिय किंवा माघार घेताना दिसल्याने या सर्व घडामोडींमध्ये आडून काही राजकीय डावपेच रचले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
English medium schools : राज्यातील १८ हजार इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा तपासणीच्या रडारवर
झोन क्रमांक तीनमध्ये भाजपचे संख्याबळ अधिक असतानाही जोरगेवार समर्थक गटनेते चंद्रशेखर शेट्टी यांनी उमेदवारी मागे घेत काँग्रेसला थेट मदत केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे भाजपच्या विजयाची खात्री असतानाही निकाल उलटला आणि काँग्रेसला बहुमत मिळाले. या प्रकारामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वात असंतोष उफाळून आला आहे.
यापूर्वीही जोरगेवार आणि पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उघड झाला होता. नगरसेवक निवडीच्या वेळी पक्षाने अधिकृत उमेदवार निश्चित करूनही जोरगेवार यांनी स्वतःचे उमेदवार उभे केले होते. या कृतीमुळे पक्षशिस्त भंग झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्या गटातील शहराध्यक्षावर कारवाई करण्यात आली होती. तसेच एबी फॉर्म संदर्भातील वाद आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या मतभेदांमुळेही ते सतत चर्चेत राहिले आहेत.
Iran us conflict : होर्मुज खाडी बंद केल्याने जागतिक तणाव शिगेला
महापालिकेतील सत्तासमीकरणात भाजपकडे संख्याबळ असूनही एकही महत्त्वाचे पद मिळाले नाही, यामुळे भाजप समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. सभागृहनेतेपदाच्या निवडीपासूनच हा संघर्ष तीव्र झाला असून समर्थक नगरसेवकांनी महापौरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. काँग्रेसच्या मदतीने अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचालीही सुरू असल्याची चर्चा आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर जोरगेवार काँग्रेसच्या जवळ जात असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपमध्ये अंतर्गत रोष उघडपणे समोर आला असून आगामी काळात चंद्रपूरच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
__








