credit war on railway over bridge between bjp and vanchit bahujan aghadi : उड्डाणपुलाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेवरून भाजप-वंचित आमने-सामने
Akola सातव चौक ते न्यू तापडिया नगरदरम्यान प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलासाठी १०४.७९ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर शहरात श्रेयवादाला उधाण आले आहे. या निर्णयावरून भाजप आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आणि संबंधित विभागांशी झालेल्या संवादामुळेच शासनाने या प्रकल्पाला गती देत मान्यता दिल्याचा दावा वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच गटनेते नीलेश देव यांनीही काही दिवसांपूर्वी उड्डाणपुलाच्या विलंबावर आवाज उठवत नागरिकांच्या वाहतूक समस्यांकडे लक्ष वेधले होते, असेही सांगण्यात येत आहे.
Railway over bridge : अखेर त्या उड्डाणपुलाच्या कामाला सुधारित मान्यतेचे ‘पिलर’!
दुसरीकडे, सत्ताधारी भाजपने हा दावा फेटाळून लावत प्रकल्पाची प्रक्रिया आधीपासूनच सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून या उड्डाणपुलासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे विषय लावून धरल्यानेच शासनाने जीआर काढत १०४.७९ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. दरम्यान, विकासाच्या या निर्णयावरून सुरू झालेला श्रेयवाद शहरातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून, दोन्ही पक्षांतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.








