manohar-mama-bhosale-arrest-fraud-assault-case-solapur-police : मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा अटकेत, अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद
Solapur : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामाचा अवतार असल्याचे भासवत भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापूर्वीही त्याच्यावर बलात्कारासह अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.
कुर्डुवाडी परिसरातील एका रिअल इस्टेट व्यावसायिकाची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून हे प्रकरण उघडकीस आले. फिर्यादीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचे आमिष दाखवत मनोहर भोसले याच्याशी संपर्क साधण्यात आला. पूजा करून अडचणी दूर केल्या जातील असे सांगून दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली आणि त्यातील पन्नास हजार रुपये तातडीने देण्यास सांगितले. करमाळा तालुक्यातील निभोरे येथे एका व्यक्तीकडे पैसे देण्यात आले, मात्र त्यानंतर संपर्क तुटल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पीडिताने पोलिसांत तक्रार दाखल केली.
Anna hazare : सत्ता, पैशासाठी होणाऱ्या फुटींवर कठोर कायद्याची अण्णा हजारेंची मागणी
तपासादरम्यान मनोहर भोसले याच्याविरोधात पूर्वीपासून गंभीर गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले. २०२१ मध्ये एका महिलेने काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणात त्याला अटक होऊन काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला होता. तसेच कर्करोग बरा करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा बारामतीत नोंद आहे. दौंड येथे मणक्याचे आजार बरे करण्याचे आश्वासन देऊन पैशांची उकळपट्टी केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे.
मनोहर भोसले हा इंदापूर तालुक्यातील लारसुणे गावचा रहिवासी असून सुरुवातीला साधा उदरनिर्वाह करणारा व्यक्ती होता. काही वर्षांनंतर स्वतःला संत बाळूमामांचा आशीर्वाद लाभल्याचे सांगत त्याने करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे मठ उभारला. अमावस्या आणि पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होऊ लागली होती.
Devendra fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्ट भूमिका; वाद नको पण मराठीला प्राधान्य आवश्यक!
दरम्यान, त्याचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो असल्याचीही चर्चा असून काही नेते आणि कार्यकर्ते त्याच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर उंदरगाव येथील आश्रम बंद करण्यात आला होता, मात्र त्यानंतर त्याने आपला कारभार पुण्यात हलवून पुन्हा सुरू केल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या सोलापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी पीडित समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








