Internal conflicts within NCP Ajit Pawar: राजू जैन यांचे राजकीय पुनर्वसन पुन्हा लांबणीवर
Nagpur राज्याच्या राजकारणात अजित दादांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत सत्तासंघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि दिग्गज नेते प्रफुल पटेल यांच्यातील मतभेद विधान परिषदेच्या उमेदवारीवरून चव्हाट्यावर आले आहेत. प्रफुल पटेल यांचे अत्यंत खंदे समर्थक माजी आमदार राजू जैन यांच्या उमेदवारीला डावलून सुनेत्रा पवारांनी झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
विदर्भात, विशेषतः भंडारा-गोंदिया पट्ट्यात प्रफुल पटेल यांची सर्व सूत्रे राजू जैन हेच हलवतात. जैन यांचा शब्द हा खुद्द पटेलांचाच आदेश मानला जातो. भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या परिणय फुके यांच्याकडून झालेल्या धक्कादायक पराभवानंतर, जैन यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी प्रफुल पटेल गेल्या अनेक दिवसांपासून फिल्डिंग लावून होते. अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतर जैन यांना विधान परिषदेवर पाठवण्याच्या हालचालींना वेग आला होता. मात्र, ऐनवेळी त्यांच्या शिफारसीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
दुसरीकडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आपल्या मुलासाठी जोर लावला होता. परंतु, सुनेत्रा पवार यांनी प्रफुल पटेल आणि तटकरे या दोन्ही बड्या नेत्यांच्या दबावाला बळी न पडता, अजित दादांनी बाबा सिद्दिकींना दिलेला शब्द पाळण्याला प्राधान्य दिले. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र झिशान यांना आमदार करण्याची ग्वाही दादांनी दिली होती. तोच शब्द प्रमाण मानून सुनेत्रा पवारांनी झिशान सिद्दिकींची उमेदवारी जाहीर करून पक्षात आता आपलेच वर्चस्व चालणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Pole of Poles : पाच राज्याच्या एक्झिट पोलचे मोठे अंदाज; बंगालमध्ये काय होणार?
या निर्णयामुळे प्रफुल पटेल यांना मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. विदर्भातील आपल्या सर्वात विश्वासू सहकाऱ्याला न्याय मिळवून देण्यात पटेलांना आलेले अपयश, हे पक्षात पडलेल्या दोन गटांचेच प्रतिबिंब असल्याचे बोलले जात आहे. आता राजू जैन यांना आगामी भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. सुनेत्रा पवारांच्या या ‘मास्टरस्ट्रोक’मुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचा प्रभाव कमी होऊन ‘सुनेत्रा पर्व’ प्रभावी ठरणार, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.








