व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bjp conflict : ‘मेरा नंबर कब आयेगा?’ नागपूर विधान परिषदेसाठी भाजपमध्ये अंतर्गत...

Bjp conflict : ‘मेरा नंबर कब आयेगा?’ नागपूर विधान परिषदेसाठी भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष

bjp-inner-conflict-over-nagpur-vidhan-parishad-election-rural-vs-city-politics : राजकीय हालचालींना वेग, शहर विरुद्ध ग्रामीण वाद पेटला

Nagpur : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षातील इच्छुक नेत्यांनी पुन्हा एकदा आमदारकीच्या आशा बाळगण्यास सुरुवात केली असून “मेरा नंबर कब आयेगा?” अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी शहर विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष उभा राहताना दिसत असून भाजपमध्ये उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच रंगण्याची चिन्हे आहेत.

संजय भेंडे यांना अखेर प्रतीक्षेनंतर राजकीय संधी मिळाल्यानंतर आता ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि नेत्यांमध्येही अपेक्षा वाढल्या आहेत. भेंडे हे नागपूर शहरातील असल्याने यंदा ग्रामीण भागाला प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी भाजपच्या ग्रामीण गटातून जोर धरू लागली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींसमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Neet paper leak : मोटेगावकर क्लासेसचे शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात

सध्या ग्रामीण भागातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजू पोतदार यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. सावनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रभावशाली नेते सुनील केदार यांचे राजकीय वर्चस्व संपवण्यात पडद्यामागून महत्त्वाची रणनीती आखणाऱ्यांमध्ये पोतदार यांचे नाव अग्रस्थानी मानले जाते. आशिष देशमुख यांच्यासाठी स्वतःची जागा सोडून ‘काट्याने काटा’ काढण्याची त्यांनी आखलेली रणनीती भाजपसाठी निर्णायक ठरल्याची चर्चा पक्षात आहे.

डॉ. राजू पोतदार यांच्या निष्ठेची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही एका जाहीर कार्यक्रमात खुलेपणाने त्यांना आमदार करण्याची मागणी केली होती. “निष्ठावंत कार्यकर्त्यांची कदर झाली पाहिजे,” असे वक्तव्य करत गडकरी यांनी पोतदार यांच्या नावाला अप्रत्यक्ष बळ दिले होते. त्यामुळे आता भाजप नेतृत्व पोतदार यांना विधान परिषदेत संधी देऊन त्यांच्या राजकीय निष्ठेचे चीज करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vidhan parishad election : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणधुमाळी सुरू

दुसरीकडे, भाजपने पुन्हा शहरातील चेहऱ्यावर भर दिल्यास माजी महापौर आणि विद्यमान शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी किंवा माजी नगरसेवक विक्की कुकरेजा यांची नावे चर्चेत येऊ शकतात. विशेष म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उमेदवारीपूर्वी विक्की कुकरेजा यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र त्या काळात पक्षासाठी बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन महत्त्वाचे मानले गेले आणि अखेर त्यांनाच उमेदवारी देण्यात आली होती.

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा नेहमीच राजकीय नाट्य आणि अनपेक्षित घडामोडींसाठी चर्चेत राहिला आहे. विधानसभा निवडणुकीतील धक्का आणि पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर भाजपने याच मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेत पाठवत त्यांचे राजकीय पुनर्वसन केले होते. त्या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक छोटू भोयर यांना उमेदवारी देत मोठी रणनीती आखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे भोयर यांना पक्षाचा अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही.

Nitin gadkari : ‘१ रुपयाचं काम, १० रुपयांची पब्लिसिटी’; नितीन गडकरींचा राजकारण्यांना टोला

राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसने ऐनवेळी अधिकृत उमेदवार बदलल्याने छोटू भोयर यांना केवळ एक मत मिळाल्याची चर्चा त्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि पुढे ते कामठी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याने विधान परिषदेची ही जागा गेल्या दीड वर्षांपासून रिक्त आहे.

या मतदारसंघाचे यापूर्वी गिरीश व्यास, राजेंद्र मुळक, अशोक मानकर आणि सागर मेघे यांनी प्रतिनिधित्व केले आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे इतिहासात प्रथमच जिल्हा परिषद सदस्यांशिवाय ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा परिषद सदस्य मतदान प्रक्रियेपासून दूर राहणार असल्याने संपूर्ण राजकीय गणित बदलले आहे.

Uddhav thackeray : सभागृहात दांड्या, उद्धव ठाकरेंची 4 वर्षांत फक्त 42 दिवस हजेरी !

नागपूर महापालिका आणि जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकांमध्ये भाजपचे स्पष्ट वर्चस्व असल्यामुळे ही निवडणूक तांत्रिकदृष्ट्या पक्षासाठी सोपी मानली जात आहे. त्यामुळे विरोधकांपेक्षा भाजपमधील अंतर्गत इच्छुकांमध्येच खरी चुरस पाहायला मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी काही दिवसांत उमेदवारीवरून पक्षांतर्गत लॉबिंग, शक्तिप्रदर्शन आणि गटबाजी आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

___

error: Content is protected !!