
neet-exam-paper-leak-shivraj-motegaonkar-rcc-classes-cbi-custody-latur : नीट पेपरफुटी प्रकरणात लातूर हादरलं, राज्यभरात खळबळ
Mumbai : देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता महाराष्ट्रातील लातूर कनेक्शन अधिक गडद होताना दिसत आहे. लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने ताब्यात घेतल्याने राज्यातील कोचिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून लातूर आणि पुण्यात सुरू असलेल्या चौकशीनंतर अखेर सीबीआयने ही मोठी कारवाई केली आहे.
शिवराज मोटेगावकर यांची काल जवळपास 11 तास कसून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत नेमकी कोणती माहिती समोर आली हे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेले नसले तरी चौकशीनंतर सीबीआयच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. लातूरमधील प्राध्यापक एस. पी. कुलकर्णी यांचे नाव या प्रकरणातील कथित मास्टरमाइंड म्हणून समोर आल्यानंतर सीबीआयचे विशेष पथक लातूरमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर शहरातील काही खासगी कोचिंग क्लासेस आणि संबंधित व्यक्तींवर चौकशीची कारवाई वेगाने सुरू झाली.
Vidhan parishad election : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणधुमाळी सुरू
सीबीआयच्या तपासात आरसीसी कोचिंग क्लासेसमधील काही विद्यार्थ्यांबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. मोटेगावकर यांच्या क्लासमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आणि तिच्या वडिलांची देखील सीबीआयकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. नीट परीक्षेचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे काही विद्यार्थ्यांपर्यंत आधीच पोहोचवण्यात आली होती का, याचा तपास सध्या सीबीआयकडून केला जात आहे. याच अनुषंगाने काही विद्यार्थी आणि पालकही तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याची चर्चा सुरू आहे.
शिवराज मोटेगावकर यांच्या क्लासेसच्या शाखा केवळ लातूरपुरत्याच मर्यादित नसून राज्यातील विविध शहरांसह देशभरात असल्याचे सांगितले जात आहे. तपासादरम्यान या प्रकरणात नांदेड कनेक्शनही समोर आले असून त्याची स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे. मोटेगावकर यांच्या क्लासेसचा पेपरफुटी प्रकरणाशी थेट संबंध आहे का, याबाबत सीबीआय सध्या सर्व पुरावे आणि व्यवहारांची तपासणी करत आहे.
Nitin gadkari : ‘१ रुपयाचं काम, १० रुपयांची पब्लिसिटी’; नितीन गडकरींचा राजकारण्यांना टोला
दरम्यान, लातूरमधील चौकशीनंतर नांदेडमधील काही खासगी कोचिंग क्लासेसमध्येही अचानक हालचाली वाढल्या आहेत. सकाळी क्लासला आलेल्या विद्यार्थ्यांना अचानक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्याचे समोर आले आहे. काही क्लासेसने विद्यार्थ्यांना घरी पाठवल्यानंतर कार्यालयांचे शटर बंद केल्यामुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. सीबीआयच्या चौकशीच्या भीतीमुळेच हे क्लासेस बंद ठेवण्यात आले का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात आधीच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात महाराष्ट्रातील लातूरसारख्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या शहराचे नाव या प्रकरणात समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. सीबीआयच्या पुढील तपासात आणखी कोणती मोठी नावे समोर येतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
__








