neet-paper-leak-impact-on-engineering-pharmacy-admissions-academic-session-delay :
‘नीट’ पेपरफुटीचा शिक्षण व्यवस्थेला मोठा धक्का
Mumbai: देशभरात गाजत असलेल्या ‘नीट-यूजी २०२६’ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाचे गंभीर पडसाद आता राज्यातील इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेवर उमटू लागले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात आलेली ‘नीट-यूजी २०२६’ परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर इंजिनिअरिंग आणि फार्मसी प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
३ मे २०२६ रोजी देशभरात घेण्यात आलेल्या ‘नीट-यूजी’ परीक्षेला तब्बल २२ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. मात्र प्रश्नपत्रिका फुटीच्या आरोपांनंतर या परीक्षेवर संशय निर्माण झाला आणि अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर वैद्यकीय शिक्षणासोबतच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेवरही त्याचा थेट परिणाम होऊ लागला आहे.
राज्यातील काही विशिष्ट इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांसाठी तसेच बी.फार्मसीच्या १५ टक्के ऑल इंडिया कोट्यातील प्रवेशांसाठी ‘नीट’ गुण ग्राह्य धरले जातात. त्यामुळे ‘नीट’चा अंतिम निकाल जाहीर झाल्याशिवाय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू करणे शक्य होणार नाही. परिणामी सीईटी सेलच्या संपूर्ण नियोजनावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
दरम्यान, २१ जून रोजी ‘नीट’ची पुनर्परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पुनर्परीक्षेनंतर निकाल जाहीर होण्यासाठी आणखी २० ते २५ दिवस लागू शकतात. त्यामुळे जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा अखेरपर्यंत अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकणार नसल्याचे चित्र आहे.
यामुळे दरवर्षी जून-जुलैमध्ये सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया यंदा मोठ्या प्रमाणात उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवेश प्रक्रिया लांबल्यास नवीन शैक्षणिक सत्रही उशिराने सुरू होणार असून, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम पूर्णत्वावर होणार आहे. विशेषतः प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे हे महाविद्यालये आणि प्राध्यापकांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. परीक्षांमधील सततचा गोंधळ, पेपरफुटी आणि बदलणारे वेळापत्रक यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील तपासही वेगाने सुरू असून केंद्रीय अन्वेषण विभागाने पुण्यातून आणखी एका आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव डॉक्टर मनोज शिरुरे असून तो व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ आहे. स्वतःच्या मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात शिवराज मोटेगावकर याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
Jhural janata party : ‘झुरळ जनता पार्टी’मुळे देशाच्या राजकारणात नवा वाद
सीबीआयने डॉक्टर मनोज शिरुरे याला लातूरमधून चौकशीसाठी पुण्यात आणले होते. त्यानंतर झालेल्या चौकशीत काही महत्त्वाची माहिती समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या कारवाईमुळे पेपरफुटी प्रकरणातील तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेवरील विश्वास या प्रकरणामुळे डळमळीत झाला असून, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.








