An Innovative Protest by Shiv Sena in Nagpur Against Inflation and ‘Event’ Politics : महागाई आणि ‘इव्हेंट’ राजकारणाचा नागपुरात शिवसेनेकडून अनोखा निषेध
Nagpur देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ, गॅस सिलेंडरचे गगनाला भिडलेले भाव, शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटीच्या घटना आणि केंद्र सरकारचे ‘इव्हेंट’ राजकारण यांमुळे त्रस्त झालेल्या जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नागपूर तर्फे सीताबर्डी येथील व्हेरायटी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या महागाई धोरणाचा आणि पंतप्रधानांच्या ‘मेलोडी’ राजकारणाचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी जनतेला ‘मेलोडी चॉकलेट’ वाटून एक अनोखे आणि उपरोधिक आंदोलन केले. हे आंदोलन संपर्क प्रमुख सतीश हरडे यांच्या मार्गदर्शनात आणि महानगर प्रमुख व माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात पार पडले.
यावेळी शहर प्रमुख संदीप रियाल पटेल, विक्रम राठोड आणि हरिभाऊ बनाईत प्रामुख्याने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान महानगर प्रमुखांनी डोक्याला काळी पट्टी बांधून, तर उपस्थित शेकडो शिवसैनिकांनी आपल्या दंडाला काळ्या पट्ट्या बांधून केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. “जनता त्रस्त, मोदी मस्त… मेलोडी खाओ, खुद जान जाओ” अशी जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी संपूर्ण व्हेरायटी चौक परिसर दणाणून सोडला होता.
बेरोजगारीने होरपळणाऱ्या युवकांना ‘कॉकरोच’ संबोधले जात असून सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ सक्रिय झाली आहे, पण ती वेळ आता दूर नाही जेव्हा ‘जेन जी’ जनरेशनचे तरुण रस्त्यावर उतरून या सरकारला धडा शिकवतील; सरकारने आता तरी सुधारावे, सर्वसामान्यांचा विचार करावा आणि जनतेची माफी मागावी, असा इशारा आंदोलकांनी दिला.
Cockroach janta party : सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा धडाका
केंद्र सरकारवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप करत आंदोलक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची थट्टा लावली आहे. कोरोना काळात थाळ्या वाजवण्यापासून ते आता देशात घरगुती सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यापर्यंत, देशाला महायुद्धाच्या खाईत लोटण्याचे काम सुरू आहे. देशाला विश्वगुरुचे स्वप्न दाखवायचे आणि प्रत्येक संकटाचा एक इव्हेंट करून देशाला मूर्ख बनवायचे, हेच या सरकारचे काम आहे असा आरोप या वेळी करण्यात आला.








