Attention Turns to New Leadership in Shiv Sena After Dissolution of the Executive Committee : कार्यकारीणी बरखास्त झाल्यानंतर नव्या नेतृत्वाकडे लक्ष
Akola राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये आता अकोला जिल्ह्यातील संघटनात्मक बदलांकडे लक्ष लागले आहे. शिंदे गटाच्या जिल्हा कार्यकारिणीची बरखास्ती करण्यात आल्यानंतर नव्या नेतृत्वाची चर्चा जोर धरू लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या ललित वानखडे यांच्याकडे विशेष प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने जिल्ह्यातील संघटनात्मक सूत्रे त्यांच्या हातात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, विदर्भातील नेतृत्वाची जबाबदारी बच्चू कडू यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर नव्या कार्यकारिणीत त्यांच्या समर्थकांचाही प्रभाव राहण्याची चिन्हे आहेत. बच्चू कडू यांच्या जवळचे काही कार्यकर्ते अलीकडेच शिंदे गटात दाखल झाल्याने त्यांनाही संघटनात्मक पातळीवर स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे गटाला सुरुवातीपासून साथ देणारे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या अकोला जिल्ह्यात अंतिम निर्णयक्षमता नेमकी कोणाकडे राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
Nagpur Shivsena : ‘मेलोडी खाओ, खुद जान जाओ’, शिवसेनेचे ‘चॉकलेट’ आंदोलन
नव्या कार्यकारिणीत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांचे वर्चस्व राहू शकते, अशी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना पक्षांतर्गत विविध स्तरांतून विरोध होत असल्याने नव्या कार्यकारिणीत त्यांचा प्रभाव तुलनेने कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संघटनात्मक सोयीसाठी ग्रामीण आणि शहर अशा दोन स्वतंत्र भागांत संघटना विभागली जाऊ शकते. अशा स्थितीत ग्रामीण भागाची जबाबदारी चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्याकडे, तर शहरातील नेतृत्वासाठी गोपीकिशन बाजोरिया यांना बळ देण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.








