व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Cockroach janata party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा सोशल मीडियावर धुमाकूळ; संघ म्हणते...

Cockroach janata party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा सोशल मीडियावर धुमाकूळ; संघ म्हणते ही युवकांची स्वभाविक प्रतिक्रिया

RSS believes that the “Cockroach Janata Party” is a natural reaction of the youth : शताब्दी वर्षानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देशभर संवाद यात्रा

Nagpur देशाच्या राजकीय पटलावर सध्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलाच धुमाकूळ घातला असून, या नव्या व्हर्च्युअल पार्टीला मिळणाऱ्या अभूतपूर्व आणि प्रचंड प्रतिसादाने प्रस्थापित राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या पाच ते सहा दशकांपासून देशाच्या राजकारणावर पकड असलेल्या सत्ताधारी आणि विरोधक, दोन्ही आघाड्यांना या लाटेने मागे टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. विरोधकांनी या ट्रेंडला थेट सरकारविरोधी असंतोष ठरवत सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे, मात्र या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या प्रतिसादाला युवकांची स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे सांगितल्यामुळे, अप्रत्यक्षपणे भाजपला तरुणांच्या मागण्यांची दखल घेण्याचेच सूचवले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

शताब्दी वर्षानंतर संघातर्फे देशभरात ‘संवाद यात्रा’ राबवण्यात येत असून, याद्वारे थेट तालुक्यांपर्यंत पोहोचून जनतेच्या भावना जाणून घेतल्या जात आहेत. या दरम्यान, संघाच्या एका बड्या पदाधिकाऱ्याने ‘कॉक्रोच पार्टी’ला मिळणाऱ्या प्रतिसादावर खासगीत मत व्यक्त करताना सांगितले की, देशात लोकशाही असून प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. सोशल मीडियावरून व्यक्त होणारी ही ‘झेन झी’ म्हणजेच आजची तरुण पिढी असून ही त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, त्यामुळे यात शॉक बसण्याचे काहीच कारण नाही. यात संघ पडणार नसून सरकार याची योग्य दखल घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच संघामार्फत स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देऊन बेरोजगारी दूर करण्याचे काम सुरू असून युवकांच्या नवनव्या आयडियांना नेहमीच पाठबळ दिले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Vijay Wadettiwar : पेट्रोल पाच रुपयाने महागले भाजपचे कार्यकर्ते कुठे लपून बसले?; वाडेट्टीवारांचा टोला

संघाच्या मूळ विचारसरणीवर प्रकाश टाकताना या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले की, संघ कोणताही राजकीय अजेंडा राबवत नसून हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी विपरित परिस्थितीतही संघाचे काम अविरत सुरू आहे. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती हासुद्धा संघाचा अजेंडा नव्हता, तर तो समाजाचा अजेंडा होता आणि संघाने फक्त समाजाच्या या मागणीला संघटित शक्ती दिली. पाकिस्तानाच्या फाळणीच्या वेळी ती रोखण्याइतकी ताकद संघात नव्हती, मात्र यापुढे देशाची दुसरी फाळणी होणार नाही एवढी ताकद संघाने समाजात जनजागरण करून निर्माण केली आहे. भारतात राहणाऱ्या सर्वांचा डीएनए आणि संस्कृती एकच असून फक्त हिंदू धर्मातून बाहेर पडलेल्यांना याचा विसर पडला आहे. त्यांची ही सांस्कृतिक स्मृती पुन्हा जागृत करण्यासाठी संघाचे प्रयत्न सुरूच राहतील आणि यासाठी मोठा काळ द्यावा लागेल, असे सांगत त्यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली.

संघाने या तरुणाईच्या ट्रेण्डला थेट असंतोष न म्हणता स्वाभाविक प्रतिक्रिया ठरवल्यामुळे, आगामी काळात सत्ताधाऱ्यांना तरुणांच्या प्रश्नांवर अधिक संवेदनशीलतेने पावले उचलावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

error: Content is protected !!