Congress stages protest at petrol pumps against the hike in petrol and diesel prices : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचा एल्गार; अकोल्यात पेट्रोल पंपावर निदर्शने
Akola पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले असून महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक, अन्नधान्य, भाजीपाला आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महानगर काँग्रेस कमिटी आणि अकोला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अकोला शहरातील वाजीफदार पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार आयोजित या आंदोलनाचे नेतृत्व अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी केले. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका करत जनतेवरील अन्याय सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला.
Toxic liquor case : पुणे-पिंपरी चिंचवड विषारी दारूकांड प्रकरणात मृतांचा आकडा 18 वर
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘महागाई बंद करा’, ‘पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या’, ‘जनतेचा पैसा परत द्या’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. वाढत्या इंधन दरांमुळे सामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडत असून घरगुती गॅसच्या किमतींमुळे महिलांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार साजिद खान पठाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत इंधनावरील करांमुळे महागाई वाढल्याचा आरोप केला. सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, लघुउद्योजक आणि मध्यमवर्गीय कुटुंबे आर्थिक संकटात सापडली असून सरकारने तातडीने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर कमी करावेत, अशी मागणी त्यांनी केली. महानगर काँग्रेस अध्यक्ष महेंद्र गवई यांनीही वाढती बेरोजगारी, महागाई आणि इंधन दरवाढीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असल्याचे सांगत जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरल्याचे स्पष्ट केले.
Manoj jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणावर
या आंदोलनात जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश तायडे, नगरसेवक आजाद खान, नगरसेविका सुवर्णरेखा जाधव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले. आगामी काळात महागाईविरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.








