Congress attacks government on farmers loan waiver : महायुतीच्या कर्जमाफीवर काँग्रेसचा हल्लाबोल; ‘सरसकट कर्जमाफी द्या’ची मागणी
Buldhana राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या शासन निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत सोमवारी (८ जून) बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी केली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना प्रकाश पाटील अवचार यांनी राज्यातील महायुती सरकारच्या कर्जमाफी योजनेवर जोरदार टीका केली. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही निव्वळ दिखाऊ योजना असून, विविध अटी व शर्ती लावून ५० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ही योजना शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचेही त्यांनी म्हटले.
Ncp anniversary : अजित पवारांच्या निधनानंतरचा पहिलाच वर्धापन दिन पुढे ढकलला
पाटील म्हणाले की, सरकारची कर्जमाफी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित व थकीत झालेल्या पीककर्जापुरती मर्यादित आहे. यापूर्वीचे थकीत कर्ज असलेल्या अनेक शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळत नाही. अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले असून, त्यांची संख्या लाभार्थी शेतकऱ्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे सर्व थकीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचे खाते कोरे करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या योजनेत अपेक्षित लाभ मिळणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच विहीर, पाइपलाइन, पशुधन खरेदी यांसाठी घेतलेले कर्ज या योजनेच्या कक्षेबाहेर असल्याने मोठा शेतकरी वर्ग वंचित राहणार असल्याचा आरोप त्यांनी केला.
Ujjwala scheme : अनुदानित एलपीजी सिलेंडरची संख्या ९ वरून ४ वर!
भाजप-महायुती सरकार शेतकरीहिताचा केवळ दावा करीत असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवण्याचे काम करीत असल्याचा घणाघात काँग्रेसने यावेळी केला. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रकाश पाटील अवचार यांनी दिला. आंदोलनात प्रदेश सरचिटणीस डॉ. अरविंद कोलते यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








