Late datta meghe’s son joins Ajit Pawar NCP : भाजप युवा मोर्चामध्ये होते सक्रिय, आता निवडला राष्ट्रवादीचा पर्याय
Nagpur विदर्भाचे ज्येष्ठ नेते आणि दानशूर व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले दिवंगत दत्ताभाऊ मेघे यांच्या आणखी एका पुत्राने राजकारणात सक्रिय पाऊल टाकले आहे. मुंबईत स्थायिक असलेले दत्ताभाऊंचे चिरंजीव अर्जुन मेघे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, यापूर्वी ते भारतीय जनता युवा मोर्चात (भाजयुमो) कार्यरत होते.
दत्ताभाऊंचे एक चिरंजीव समीर मेघे हे सध्या भाजपचे आमदार असून, त्यांनी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक नोंदवली आहे. तर दुसरे चिरंजीव सागर मेघे हेदेखील माजी विधान परिषद सदस्य आहेत. त्यांनी यापूर्वी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र सध्या ते सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर आहेत. तरीही भविष्यात ते पुन्हा वर्धा लोकसभा मतदारसंघावर दावा करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
काही वर्षांपूर्वी सागर मेघे यांना काँग्रेसने वर्ध्यातून लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात भाजपने रामदास तडस यांना मैदानात उतरवले होते. तडस हे एकेकाळी मेघे यांचेच कार्यकर्ते म्हणून ओळखले जात असल्याने, ती निवडणूक ‘मिलीभगत’ असल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. सागर मेघे निवडून यावेत म्हणून भाजपने जाणीवपूर्वक कमकुवत उमेदवार दिला, असे दावेही केले गेले. मात्र, २०१४ च्या मोदी लाटेत मोठा उलटफेर झाला; सागर मेघे यांचा पराभव झाला आणि रामदास तडस खासदार बनले. यानंतर दत्ताभाऊ मेघे यांनी सहकुटुंब भाजपमध्ये प्रवेश केला. समीर मेघे आमदार झाले, तर सागर मेघे यांना पुन्हा उमेदवारी देण्याची तयारी सुरू झाली. मात्र, तोपर्यंत तडस यांनी मतदारसंघात चांगलाच जम बसवला होता. पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि ‘सिटिंग गेटिंग’च्या नियमानुसार पुन्हा तडस यांनाच उमेदवारी मिळाली. दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रामदास तडस यांचा पराभव झाला असून, सध्या तिथून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अमर काळे खासदार म्हणून निवडून आले आहेत.
आता अर्जुन मेघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आहेत. ते भाजयुमो दक्षिण मुंबईचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. या पक्षप्रवेशावेळी राज्यमंत्री इंद्रनीला नाईक, आमदार संजय खोडके, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, पक्षाचे नेते उमेश पाटील, प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सध्या महायुतीत एकत्र आहेत. मुंबईत भाजपची ताकद मोठी असतानाही, अर्जुन मेघे यांनी भाजप युवा मोर्चा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र, यामागे काही राजकीय गणिते असल्याचे बोलले जाते. एकाच कुटुंबातील किती सदस्यांना भाजप तिकीट देणार, असा प्रश्न भविष्यात येऊ नये म्हणून अर्जुन मेघेंनी आधीच आपली वेगळी वाट निवडल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
दिवंगत दत्ताभाऊ मेघे हे शरद पवार यांना आपले राजकीय गुरू मानत असत. ज्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडन फारकत घेण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी ते प्रचंड भावूक झाले होते आणि पत्रकार परिषदेत त्यांना रडू कोसळले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असल्याने, वर्धा लोकसभेच्या जागेसाठी त्यांनी ही तडजोड केल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी सोडल्यानंतरही त्यांचे शरद पवारांशी असलेले कौटुंबिक संबंध कायम होते. दत्ताभाऊंच्या निधनानंतर, प्रकृती बरी नसतानाही शरद पवार विशेष विमानाने मेघे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी नागपूरला आले होते. दुसऱ्या बाजूला, नंतरच्या काळात दत्ताभाऊंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही गुरूस्थानी मानले होते. त्यांनी आपल्या संपत्तीचे मृत्युपत्र गडकरी यांच्याकडे सुपूर्द केले होते, ही बाब स्वतः दत्ताभाऊंनी जाहीरपणे सांगितली होती. आता अर्जुन मेघे यांच्या या नव्या राजकीय खेळीमुळे मेघे कुटुंबाचा राजकीय पट आणखी विस्तारला आहे.








