व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative election : एमआयएम, मुस्लिम लीग तटस्थ; नागपुरात ९८.४४% मतदान, कोणाचा गेम...

Legislative election : एमआयएम, मुस्लिम लीग तटस्थ; नागपुरात ९८.४४% मतदान, कोणाचा गेम होणार?

98.44% voting in Nagpur for legislative election : ११ नगरसेवकांचा मतदानावर बहिष्कार, राजकीय गणिते बदलली

Nagpur नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत ९८.४४ टक्के इतके विक्रमी मतदान झाले असले, तरी एमआयएम आणि मुस्लिम लीगच्या तटस्थतेमुळे आता राजकीय गणिते बदलली आहेत. नागपूर महानगरपालिकेतील एमआयएमचे ६, मुस्लिम लीगचे ४ आणि बसपाचा १ अशा एकूण ११ नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. तर उमरेड आणि कामठी येथील प्रत्येकी एक असे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. या १३ मतांच्या गैरहजेरीचा थेट फटका कोणाला बसणार आणि फायदा कोणाला होणार, याचीच चर्चा आता विदर्भाच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या निवडणुकीत भाजप-महायुतीचे राजीव पोतदार आणि काँग्रेस-महाविकास आघाडीचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत होत आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण ८३६ मतदार असून, त्यांच्यासाठी १४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, आता सर्वांचे लक्ष २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे ही मतमोजणी पार पडेल.

Arjun Meghe: मेघे कुटुंबातील आणखी एका पुत्राची राजकारणात एन्ट्री, अर्जुन मेघे यांनी हाताला बांधले घड्याळ

नागपूर महापालिकेत भाजपचे १०३ तर काँग्रेसचे ३३ नगरसेवक आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर भाजपकडे तब्बल ५२० हून अधिक मतदारांचे संख्याबळ आहे, तर काँग्रेसकडे जेमतेम दोनशेच्या घरात मते आहेत. या प्रचंड फरकामुळे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. पराभव निश्चित असताना उगाच पैसा आणि इंधनाचा अपव्यय कशासाठी करता, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला होता.

संख्याबळात मागे असलेल्या काँग्रेसला एमआयएम, मुस्लिम लीग आणि बसपाच्या तटस्थ राहिलेल्या नगरसेवकांकडून मतदानाची मोठी अपेक्षा होती. मात्र, ऐनवेळी या ११ नगरसेवकांनी मतदानापासून लांब राहणे पसंत केल्यामुळे काँग्रेसच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. दुसरीकडे, स्पष्ट बहुमत असतानाही भाजपने कोणतीही जोखीम पत्करली नव्हती. आपल्या हक्काच्या मतदारांना आधीच गोव्याला सहलीवर पाठवून पक्षाने एकही मत फुटणार नाही याची चोख व्यवस्था केली होती.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भातील पाचही मतदारसंघांत निवडणूक लढण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्ष मैदानात काँग्रेसची मोठी नाचक्की झाली. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली येथील काँग्रेस उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्याने भाजपचे अरुण लखानी बिनविरोध निवडून आले.

Ashish Jaiswal : राजकारणात खुर्च्या बदलतात, कर्तृत्व नाही! अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडून सुधीरभाऊंच्या कार्यशैलीचे भरभरून कौतुक

यवतमाळमध्येही काँग्रेस उमेदवाराच्या माघारीमुळे शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला. भंडारा-गोंदिया येथेही काँग्रेस उमेदवाराने ऐनवेळी नांगी टाकल्यामुळे पक्षाला नाईलाजाने एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला. अमरावतीत तर वेगळेच नाट्य घडले; काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख आजारपणाचे कारण पुढे करून प्रचारातूनच गायब झाले. यावरून संतप्त झालेल्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आमचे उमेदवार विकले गेले, असा जाहीर आरोप करत पक्षांतर्गत खळबळ उडवून दिली. काही नेत्यांनी देशमुख यांच्याऐवजी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केली, पण मतदानाच्या दिवसापर्यंत पक्षाला निर्णय घेता आला नाही. परिणामी, भाजप महायुतीचे प्रवीण पोटे यांचा विजय सोपा झाला आहे.

एकंदरीत, विदर्भातील इतर जागांवर आधीच शरणागती पत्करलेल्या काँग्रेसची प्रतिष्ठा आता केवळ नागपूरच्या जागेवर टिकून आहे. मात्र, एमआयएम आणि मुस्लिम लीगच्या तटस्थतेमुळे भाजपचे पारडे प्रचंड जड झाले असून, २२ जून रोजी केवळ राजीव पोतदार यांच्या विजयाच्या अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी असल्याचे चित्र आहे.

error: Content is protected !!