BJP corporators got an opportunity to visit Goa because of me, quipped Congress leader Atul Londhe after suffering a crushing defeat : भाजपवर पैशांचा आणि दबावाचा वापर केल्याचा थेट आरोप
Nagpur नागपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर, उमेदवार अतुल लोंढे यांनी भाजपवर आणि सद्य राजकीय परिस्थितीवर जळजळीत शब्दांत प्रहार केला आहे. या निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवाराला स्वतःच्या संख्याबळापेक्षा तब्बल शंभर मते अधिक मिळाली, तर काँग्रेसला महाविकास आघाडीची हक्काची मतेही राखता आली नाहीत. या मोठ्या पराभवानंतर माध्यमांशी बोलताना अतुल लोंढे यांनी भाजपवर पैशांचा आणि दबावाचा वापर केल्याचा थेट आरोप केला.
येथे हार-जितचा प्रश्नच नव्हता, कारण भाजपने ही निवडणूक केवळ पैशाच्या जोरावर जिंकली आहे. आज देशात खासदार आणि आमदार उघडपणे विकले जात आहेत. मी ही निवडणूक केवळ जय-पराजयासाठी नाही, तर लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी तसेच ‘ईडी’सारख्या यंत्रणांच्या दबावाविरोधात लढलो. या अडचणीच्या काळात पक्षाने दिलेल्या या लढ्याचा भाग होता आले, याचेच मला मोठे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया लोंढे यांनी दिली.
Devendra fadnavis : ‘उजाडलेल्या गावाची पाटीलकी सोडतो म्हणण्यासारखं’ ऑपरेशन टायगरवरही मोठं वक्तव्य
या पराभवानंतर भाजपला खोचक टोला लगावताना अतुल लोंढे म्हणाले की, खरे तर भाजपच्या नगरसेवकांनी माझे जाहीर आभार मानले पाहिजेत. भाजप नेत्यांची ही निवडणूक बिनविरोध करण्याची इच्छा होती. मात्र, आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळेच भाजपच्या नगरसेवकांना ‘गोवा पर्यटनाची’ सुवर्णसंधी लाभली. भाजपच्या काही नगरसेवकांनी तर यासाठी खाजगीत माझे आभारही मानले आहेत; त्यामुळे हा देखील आमचा एक प्रकारचा विजयच आहे.
Dr. Rajeev potdar: पोतदार जिंकले, केदार कोंडीत; आता आमदाराचा रोख जिल्हा बँक घोटाळ्याकडे
महाविकास आघाडीची मते फुटल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आमची किती मते फुटली, याची आकडेवारी मी काढणार नाही आणि कोणाविरुद्ध तक्रारही करणार नाही. ज्यांनी मला मतदान केले त्यांचेही भले आणि ज्यांनी नाही केले त्यांचेही भले! आम्ही या पराभवानंतर शांत न बसता निश्चितपणे आत्मपरीक्षण करू, असे सांगत लोंढे यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.








