free-seeds-for-resowing-farmers-dpdc-fund-chandrashekhar-bawankule-announcement : मोफत बियाणे देण्याचा राज्य सरकारचा निर्णय, डीपीडीसी निधीतून होणार मदत
Mumbai: राज्यात पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली असताना राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. बोगस बियाण्यांमुळे पीक उगवले नाही किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होऊन दुबार पेरणीची वेळ आल्यास बाधित शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी) निधीतून मोफत बियाणे उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.
राज्यात अनेक भागांमध्ये विशेषतः विदर्भात पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने खरीप पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. सोयाबीन, कापूस आणि इतर पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास अनेक ठिकाणी दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. अशा परिस्थितीत पुन्हा बियाणे खरेदी करण्याचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडू नये, यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यात काही ठिकाणी बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन आणि कापसाचे पीक उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागते. अशा वेळी शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून बियाणे खरेदी करावी लागू नयेत, यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री डीपीडीसी निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देतील आणि बाधित शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचे वाटप करण्यात येईल.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 2 लाख 96 हजार 674 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली असून, हे एकूण अपेक्षित क्षेत्राच्या सुमारे 61 टक्के आहे. सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांची जवळपास संपूर्ण पेरणी पूर्ण झाली असली, तरी भात लागवडीसाठी आवश्यक पाऊस अद्याप न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी भात पेरणी पुढे ढकलली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, जून महिन्यात नागपूर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 61 टक्के पावसाची नोंद झाली होती. तर जुलै महिन्यात 14 जुलैपर्यंत फक्त 32 टक्के सरासरी पाऊस झाला आहे. पावसातील या मोठ्या तुटवड्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून, पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट अधिक तीव्र होऊ शकते.
दरम्यान, कृषी विभागाने सध्या नागपूर जिल्ह्यात दुबार पेरणीची अधिकृत नोंद झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र हवामानातील अनिश्चितता कायम राहिल्यास परिस्थिती बदलू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या मोफत बियाणे योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती किंवा बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
__








