Direction to prioritize solving people’s problems : आमदार खरात यांनी अधिकाऱ्यांना सुनावले; मेहकर-लोणार विकास आढावा बैठक
Buldhana ‘आपल्याला मेहकर-लोणार मतदारसंघ विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आणायचा आहे. मात्र, त्यासाठी काम करण्याची खरी इच्छाशक्ती असलेल्यांनीच या क्षेत्रात टिकावे. ज्या अधिकाऱ्यांना काम करायचे नाही, त्यांचा मार्ग मोकळा आहे,’ या शब्दांत आमदार सिद्धार्थ खरात यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
मेहकर येथील हॉटेल के व्ही प्राईड येथे पहिल्यांदाच मेहकर-लोणार मतदारसंघातील विकासकामांची तालुका स्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार सिद्धार्थ खरात होते. या बैठकीत मतदारसंघातील विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
‘आपण जनतेचे सेवक आहोत. त्यामुळे येणाऱ्या सर्व तक्रारींचे सकारात्मक निवारण करा. इतर कामांपेक्षा जनतेची कामे तत्परतेने मार्गी लावण्याला प्रथम प्राधान्य द्या,’ असे स्पष्ट निर्देश आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिले. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, तालुका अध्यक्ष निंबाभाऊ पांडव, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, मेहकर शहर अध्यक्ष किशोर गारोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय घनवट यांच्यासह विविध पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
आमदार खरात यांनी विकासकामांचा आढावा घेताना अनेक समस्यांकडे लक्ष वेधले. ‘ग्रामस्तरावरील कृती आराखड्यातील कामे प्राधान्याने पूर्ण करा. पिण्याचे पाणी, रस्ते, विजेचा पुरवठा, शेतकऱ्यांसाठी मदत यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या. तसेच, लोणार सरोवर पर्यटन केंद्राचा विकास करून त्याला लोणावळ्याच्या तोडीचे केंद्र बनवायचे आहे,’ असं त्यांनी सांगितलं.
जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेले लोणार सरोवर आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. या केंद्राचा विकास करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहन त्यांनी केलं. आपल्या सामूहिक प्रयत्नांनी आपण लोणारसाठी चांगला बदल घडवू शकतो. विकासकामे गतीने मार्गी लावून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण एकजुटीने प्रयत्न करूया, असंही ते म्हणाले.
अधिकाऱ्यांना दोन लाखाचे बक्षीस
कामगिरीत उत्कृष्टता दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आमदार सिद्धार्थ खरात यांनी विशेष घोषणा केली. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दोन लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले.