व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bjp Internal Conflict : भाजपमध्ये ‘आयाराम विरुद्ध निष्ठावंत’ संघर्ष पुन्हा ऐरणीवर!

Bjp Internal Conflict : भाजपमध्ये ‘आयाराम विरुद्ध निष्ठावंत’ संघर्ष पुन्हा ऐरणीवर!

bjp-internal-conflict-ayaram-versus-loyal-workers-row-over-archana-patil-post-in-dharashiv : अर्चना पाटील यांच्या पोस्टनंतर राजकारणात खळबळ

Mumbai : शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षात पुन्हा एकदा ‘आयाराम विरुद्ध निष्ठावंत’ हा जुना संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणाला नवे वळण मिळाले असून, जुन्या कार्यकर्त्यांचे योगदान आणि नव्या नेतृत्वाची भूमिका यावर पक्षातच तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
“भाजपच्या संघटन बांधणीत गेल्या तीस वर्षांत जुन्या कार्यकर्त्यांचे योगदान काय?” असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित झाल्यानंतर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. हा प्रश्न केवळ एका पोस्टपुरता मर्यादित राहिला नाही, तर भाजपमधील जुने आणि नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांमधील सुप्त संघर्ष पुन्हा उघड झाल्याचे मानले जात आहे.
धाराशिवमध्ये आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमाला आमदार राणा जगजीतसिंह पाटील अनुपस्थित राहिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी सोशल मीडियावर भूमिका मांडली होती. त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला.

Sunetra Pawar : प्रशांत किशोर यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी अचानक भेट

मात्र, वाढत्या वादानंतर अर्चना पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्या सध्या मुलाच्या पदवीदान समारंभासाठी परदेशात असून, वेळेतील फरकामुळे सोशल मीडिया टीमने पूर्वपरवानगीशिवाय संबंधित मजकूर अधिकृत स्टेटसवर प्रसिद्ध केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या पोस्टमधील शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अर्चना पाटील यांनी आपल्या स्पष्टीकरणात भाजप हा लाखो कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा राहिलेला परिवार असल्याचे सांगितले. धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील यश हे सर्व कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे फलित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही शक्ती पक्षाच्या एकात्मतेला तडा देण्याचा प्रयत्न करत असल्या, तरी पक्षहित आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange : बावनकुळेंच्या सांगण्यावरून मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे रद्द?

दरम्यान, भाजपमध्ये ‘आयाराम’ आणि ‘निष्ठावंत’ यांच्यातील संघर्ष हा नवीन विषय नसल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. आतापर्यंत पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांवर निष्ठावंत कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत होते. मात्र, आता परिस्थिती उलटी झाल्याचे दिसत असून, पक्षात आलेल्या नव्या नेतृत्वाकडूनच जुन्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, गेल्या काही वर्षांत विविध पक्षांमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना महत्त्वाची पदे आणि जबाबदाऱ्या मिळाल्याने मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे. निवडणुकीत पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अपेक्षित सन्मान आणि प्रतिनिधित्व मिळत नसल्याची भावना अनेक ठिकाणी व्यक्त होत आहे.
अर्चना पाटील यांच्या पोस्टनंतर समोर आलेला वाद हा केवळ एका सोशल मीडिया पोस्टचा मुद्दा नसून, भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता, नेतृत्वातील बदल आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचा मोठा राजकीय संकेत मानला जात आहे. माफी आणि खुलाशानंतर हा वाद तात्पुरता शांत झाला असला, तरी ‘आयाराम विरुद्ध निष्ठावंत’ हा संघर्ष आगामी काळात पुन्हा उफाळून येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!