व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Manoj jarange : ‘शिंदे साहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण...

Manoj jarange : ‘शिंदे साहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण तुम्हीच धोका दिलात’

manoj-jarange-patil-slams-eknath-shinde-devendra-fadnavis-over-maratha-reservation-and-kunbi-validity-row : मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील काही महिला लोकप्रतिनिधींची कुणबी जात वैधता प्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा वाद पेटला असून, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांत प्रथमच एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधत जरांगे यांनी “तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण तुम्हीच मराठा समाजाला धोका दिलात,” असा गंभीर आरोप केला.
मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि जात वैधता प्रमाणपत्रांच्या वादावर बोलताना जरांगे यांनी सरकारवर नियोजनबद्ध कट रचल्याचा आरोप केला. “प्रमाणपत्र सरकारनेच द्यायचे आणि नंतर त्याच सरकारने ते रद्द करायचे, हा मराठा समाजाविरोधातील मोठा डाव आहे. सरकार मराठा समाजाचे पद्धतशीर नुकसान करत आहे आणि यामागे मोठे राजकीय षड्यंत्र आहे,” असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले, “शिंदे साहेब, तुमचा गद्दारीचा डाग पुसण्यासाठी मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहिला होता. तुमच्या अनेक जागांवर मराठा समाजाने जीवाचे रान करून काम केले. पण आता तुम्हीच आमच्या विरोधात भूमिका घेत आहात. सत्तेत गेल्यानंतर मराठा समाजाचा विसर पडला का? तुम्ही दुहेरी भूमिका घेत आहात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मराठा समाजाच्या विरोधात काम करणारे काही ओबीसी नेते शिंदे गटाच्या कार्यालयात कसे येतात, असा प्रश्न उपस्थित करत जरांगे यांनी काही समन्वयक आणि नेत्यांवरही निशाणा साधला. “मैत्री करायची असेल तर ती ठामपणे करा. मराठ्यांच्या विरोधात बैठका घेऊन समाजाला संपवण्याचा प्रयत्न करू नका,” असा इशाराही त्यांनी दिला.

Sunetra Pawar : प्रशांत किशोर यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी अचानक भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. “फडणवीस साहेब, तुम्ही उगाच मराठा समाजाला अंगावर घेतले आहे. मराठ्यांच्या जीवावर सत्ता मिळवली आणि आता त्यांच्याच विरोधात निर्णय घेतले जात आहेत. सरकारने मराठा समाजाचे पानिपत करण्याचा कट रचला आहे,” असा आरोप जरांगे यांनी केला.
चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रसाद लाड आणि इतर मंत्र्यांवरही त्यांनी टीका केली. “फडणवीस यांच्या सांगण्याशिवाय बावनकुळे काही करू शकत नाहीत. मला राजकीयदृष्ट्या एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी कोणत्याही पक्षाचा नव्हतो आणि आजही कोणत्याही पक्षाचा नाही. त्यामुळेच मला लक्ष्य केले जात आहे,” असे जरांगे म्हणाले.
यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांचा इशाराही दिला. “२०२९ मध्ये मराठा समाज तुमच्या हातात असेल. एवढा मोठा धक्का देऊ की, त्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. युतीचे उमेदवार बोटावर मोजण्याइतकेही निवडून येणार नाहीत,” असा दावा त्यांनी केला.

Manoj Jarange : बावनकुळेंच्या सांगण्यावरून मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे रद्द?

दरम्यान, मराठा समाजाने राजकारणापासून दूर राहण्याचे आवाहन करताना त्यांनी स्पष्ट केले की, “जात वैधता मिळाल्याशिवाय कोणत्याही मराठा उमेदवाराने निवडणूक लढवू नये. समाजाच्या प्रश्नांवर बोलणारे अनेक नेते आता गप्प का आहेत?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
कुणबी नोंदी, जात वैधता आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा ढवळून निघाले असून, मनोज जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी महायुती आणि मराठा आंदोलन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

error: Content is protected !!