व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sharad Pawar : महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक खासगी कंपन्या बंद?

Sharad Pawar : महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक खासगी कंपन्या बंद?

36thousand private companies closed in Maharashtra Sharad Pawars concern over future : उद्योगांच्या भवितव्यावर शरद पवारांची चिंता

Mumbai : महाराष्ट्राच्या औद्योगिक वाटचालीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६ हजार २११ खासगी कंपन्या बंद झाल्याची माहिती संसदेत देण्यात आल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योग टिकवून ठेवण्यासाठी सरकारने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी महाराष्ट्रातील गेल्या पाच वर्षांतील बंद झालेल्या खासगी कंपन्यांची संख्या ३६ हजार २११ असल्याची माहिती दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती कामगारांच्या नोकऱ्या गेल्या, तसेच संबंधित कामगारांना पुरेसा मोबदला मिळाला का, याबाबतची माहिती सरकारकडे उपलब्ध नसल्याचेही पवार यांनी नमूद केले. रोजगार आणि उद्योग या दोन्ही दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीतील परिस्थितीचाही शरद पवार यांनी आपल्या पोस्टमधून उल्लेख केला. वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांसारख्या नागरी सुविधांच्या समस्यांमुळे चाकणमधील २० कंपन्यांनी स्थलांतराचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. या कंपन्यांमध्ये दोन हजारांहून अधिक कामगार कार्यरत असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र हे पारंपरिकदृष्ट्या उद्योगस्नेही राज्य म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योग राज्याबाहेर जाण्याची वेळ येणे किंवा कंपन्या बंद होणे ही परिस्थिती राज्याच्या औद्योगिक भवितव्यासाठी चिंताजनक असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी टिकवून ठेवण्यासाठी चाकण, तळेगाव तसेच राज्यातील अन्य औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि अन्य मूलभूत समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली.

Sudhir Mungantiwar : रानहत्ती व हिंस्त्र वन्यप्राण्यांपासून सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात प्रभावी समन्वय साधून औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न सोडवावेत, अशी सूचना पवार यांनी केली. तसेच उद्योजकांशी उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी विशेष ‘एक खिडकी’ यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

चाकण औद्योगिक परिसरातील पायाभूत सुविधांचा प्रश्न यापूर्वीही चर्चेत राहिला आहे. वाहतूक कोंडी, रस्ते, वीज, कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण यांसारख्या समस्यांमुळे उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे विविध अहवालांमधून समोर आले आहे.

“सरकार कोणत्याही विचारांचे असो; मात्र महाराष्ट्राचे औद्योगिकदृष्ट्या मागे राहणे परवडणारे नाही,” अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिलेला ‘औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र’ हा वारसा राज्यकर्त्यांनी जपला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Farmers Agristack : सातबाऱ्यावर नाव नसले तरी शेतकऱ्यांना मिळणार योजनांचा लाभ

महाराष्ट्रातील उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार टिकवून ठेवण्यासाठी सरकारने केवळ नवीन गुंतवणुकीवर भर न देता राज्यात आधीपासून कार्यरत असलेल्या उद्योगांच्या समस्या सोडवण्यावरही तितकाच भर द्यावा, असा संदेश शरद पवार यांच्या भूमिकेतून पुढे आला आहे.

error: Content is protected !!