गडचिरोलीतील वास्तवावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
Gadchiroli : राज्य सरकारकडून हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांचा आणि विविध योजनांचा गाजावाजा सुरू असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. एटापल्ली तालुक्यातील गोटाटोला गावातील ११ विद्यार्थ्यांना दररोज घनदाट जंगलातून सुमारे तीन किलोमीटर पायी चालत शाळा गाठावी लागत आहे. या मार्गावर वाघासह अन्य हिंस्र वन्यप्राण्यांचा धोका असतानाही ही चिमुकली मुले शिक्षणासाठी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. या प्रकारावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
गोटाटोला येथील विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करत विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या विकासाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘वाघापेक्षा भयानक महायुती सरकारचे अपयश ठरले आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. गावातील ११ विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज जंगलाचा रस्ता तुडवावा लागतो. या मार्गावर वन्यप्राण्यांचा वावर असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिक्षण घेण्याची इच्छा आणि भविष्यात काहीतरी घडविण्याची जिद्द या जोरावर ही मुले दररोज हा धोकादायक प्रवास करत असल्याचे वडेट्टीवार यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावरून निदर्शनास आणून दिले आहे.
ज्ञानेशकुमारांसोबत मोदींनाही हटवा; नाना पटोलेंचा नागपुरातून हल्लाबोल
राज्यात विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. हजारो कोटी रुपयांच्या योजना आणि जाहिरातींवर सरकारकडून भर दिला जात असताना गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना साधी सुरक्षित शालेय वाहतूक व्यवस्था मिळत नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केवळ घोषणा करून चालणार नाही. त्यांच्या शाळेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुरक्षित करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे सांगत वडेट्टीवार यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.
सरकारवर टीका करताना वडेट्टीवार यांनी विकासाच्या जाहिराती आणि प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती यातील फरक अधोरेखित केला. आदिवासी भागातील मुलांना सुरक्षित शाळा आणि वाहतुकीची सुविधा देण्यासाठी सरकारकडे इच्छाशक्ती नसल्याचा आरोप त्यांनी केला. ही केवळ प्रशासकीय बेपर्वाई नसून दुर्गम भागातील मुलांच्या आयुष्याशी खेळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोटाटोल्यातील ११ विद्यार्थ्यांचा प्रश्न हा केवळ एका गावापुरता मर्यादित नसून गडचिरोलीतील दुर्गम आणि आदिवासी भागातील शिक्षणव्यवस्थेसमोरील आव्हानांकडे लक्ष वेधणारा आहे. अनेक गावांमध्ये शाळा, वाहतूक, रस्ते आणि सुरक्षित प्रवास या मूलभूत सुविधांचा प्रश्न अजूनही महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी किती मोठा धोका पत्करावा लागतो, हे गोटाटोल्यातील चित्रातून समोर येत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
गोटाटोला येथील विद्यार्थ्यांसाठी तातडीने कायमस्वरूपी आणि सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. त्याचबरोबर गडचिरोलीसह राज्यातील सर्व आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही केवळ आश्वासने आणि घोषणा करून भागणार नाही. सरकारने तातडीने प्रत्यक्ष उपाययोजना करून आपली जबाबदारी पार पाडावी, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली आहे. एकीकडे विकासकामांचा आणि योजनांचा गाजावाजा, तर दुसरीकडे वाघाच्या धोक्यातून शाळेत जाणारी चिमुकली मुले, हा विरोधाभास गडचिरोलीच्या विकासाच्या दाव्यांसमोर गंभीर प्रश्न उभा करणारा ठरत आहे. त्यामुळे गोटाटोल्यातील या ११ विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची व्यवस्था सरकार कधी करणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
____








