Chief Minister responds to Opposition: 76% of the companies claimed to have shut down had never even started operations : महाराष्ट्रातील सुमारे ३६ हजार कंपन्या बंद पडल्याचा विरोधकांनी केला होता दावा
Nagpur महाराष्ट्रातील सुमारे ३६ हजार कंपन्या बंद पडल्याचा गवगवा करत सत्ताधाऱ्यांना घेरणाऱ्या विरोधकांच्या फुग्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आकडेवारीनिशी टाचणी लावली आहे. बंद पडल्याचा दावा केलेल्या कंपन्यांपैकी तब्बल ७६ टक्के कंपन्या कधी सुरूच झाल्या नव्हत्या आणि त्या केवळ ‘डिफंक्ट’ (निष्क्रिय) स्वरूपातील होत्या, असा स्पष्ट खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह विरोधकांनी या मुद्द्यावरून चिंता व्यक्त केली होती. परंतु, या आरोपांमधील हवा काढताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, संसदेत किंवा माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ही एका ठराविक प्रारूपात असतात. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (MCA) संकेतस्थळावर पारदर्शकपणे सर्व माहिती उपलब्ध असून, त्यावरून विरोधकांचा अपुरा अभ्यास आणि माध्यमांनी निर्माण केलेला आभास स्पष्ट होतो.
Pavitra portal : शिक्षक आणि पोलीस भरतीतील आरक्षणाची उच्चस्तरीय चौकशी करा
वास्तविक आकडेवारी मांडताना मुख्यमंत्री म्हणाले की, देशात आणि राज्यात ज्या कंपन्या बंद होतात किंवा रद्द केल्या जातात, त्यामध्ये ७६ टक्के कंपन्या ‘डिफंक्ट’ असतात, ज्या कधी प्रत्यक्षात सुरूच झालेल्या नसतात. याशिवाय १२ टक्के कंपन्यांचे इतर कंपन्यांमध्ये विलीनीकरण झालेले असते, तर अवघ्या २ टक्के कंपन्या कायदेशीररीत्या विसर्जित होतात. कोविडचा काळ वगळता दरवर्षी सरासरी २० ते २२ हजार निष्क्रिय कंपन्या रीतसर प्रक्रियेनुसार रद्द केल्या जातात. २०१९-२० मध्ये तर मंत्रालयाने विशेष मोहीम राबवून ६ लाख कागदी कंपन्या ‘स्ट्राईक ऑफ’ (रद्द) केल्या होत्या. त्यामुळे राज्य किंवा देशात उद्योग बंद पडले, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.
महाराष्ट्रातील औद्योगिक प्रगती घसरल्याचा भ्रम निर्माण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीचा आरसा दाखवला. २०१५-१६ मध्ये देशात ६.७८ लाख सक्रिय कंपन्या होत्या, ही संख्या आता तीन पटीने वाढून २१.१७ लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये आजही सर्वाधिक ३,९६,२११ सक्रिय कंपन्यांसह महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर आहे, तर दिल्ली (२.७२ लाख) आणि उत्तर प्रदेश (१.८५ लाख) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
Swapnil lande : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुंकतो अन् म्हणतो ‘अडचण आली तर माझ्याकडे ये’
दरवर्षी देशात नोंदणी होणाऱ्या नव्या कंपन्यांमध्येही महाराष्ट्र सतत पुढे राहिला असून, २०२५-२६ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात तब्बल ४१,५२५ नव्या कंपन्यांची नोंदणी झाली आहे. ही संख्या दिल्ली (२०,२७२) आणि गुजरातच्या (१४,६६६) तुलनेत कित्येक पटीने जास्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र उद्योगात क्रमांक एकवर होता आणि कायम क्रमांक एकवरच राहील, असा ठाम विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा अपप्रचार उधळून लावला.








